राजुर गावात गतिरोधक टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ठोकले टाळे !
गतिरोधक टाकण्याचे आश्वासन : कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
राजुर प्रतिनिधी दि. 13
राजुर गावासह शहरात आणि परिसरात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकळे आणि कर्मचाऱ्यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर चार तासांनी लेखी आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजूर येथे बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. राजुर शहरांमध्ये अति गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याबाबत निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे हे आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागले अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये कोंडून कुलूप बंद आंदोलन करण्यात आले. तसेच राजुर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे उपअभियंता दहिफळे यांच्या विनंतीवरून दुपारी दोन वाजता लेखी आश्वासन घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र येत्या दहा ते पंधरा दिवसात गतिरोधक न टाकल्यास हेच आंदोलन पुन्हा करण्यात येईल असा इशारा भारतीय मीडिया फाउंडेशन अकोले तालुका कमिटीच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी भारतीय मीडिया फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संस्थापक राजेंद्र वाघ, जयराम धादवड अकोले तालुक्याचे अध्यक्ष रोहिदास लहामगे, अकोले तालुका महिला कमिटीचे अध्यक्षा पुनम भांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक, प्रकाश शिंदे गावातील नागरीक उपस्थित होते
