‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शिर्डी, दि. 7 प्रतिनिधी –
शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेच्या माध्यमातून डिजिटल ‘शेतकरी ओळखपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांच्या (सीएससी) माध्यमातून नोंदणी करावी, असे आवाहन राहाता तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शकपणे देण्यासाठी केंद्र शासनाची ‘ॲग्रीस्टॅक’ योजना राज्यात राबविण्यात येत आहे . प्रधानमंत्री सन्मान निधीसह अन्य सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेतील शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे.

हवामान अंदाज, मृदा आरोग्य माहिती, पीक विमा, पीकविषयक उचित सल्ला, कर्ज घेणे अशा व इतर महत्त्वपूर्ण सेवांचा लाभ घेण्याकरीता या शेतकरी ओळखपत्राची आवश्यकता भासणार आहे. ओळखपत्र तयार करण्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, ८ अ, आधारक्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

‘ॲग्रीस्टॅक’ संकल्पनेची अंमलबजावणी नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरी सुविधा केंद्रांना प्रति लाभार्थी १५ रुपयांचा परतावा शासनाकडून केला जाणार आहे. आतापर्यंत राहाता तालुक्यात ११ हजार ५६० शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार झाले आहेत. उर्वरित ८८ हजार ९३४ शेतकऱ्यांनी ओळखपत्र प्राधान्याने तयार करून घ्यावे, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे.
