अकोले येथील व्यापारी अमित रासणे यास २१ लाख रुपयांचा दंड व १ वर्ष कारावासाची शिक्षा 

धनादेश अनादर प्रकरण

प्रतिनिधी —

शहरातील बाजारपेठेतील वैशाली जनरल स्टोअर्सचे व्यावसायिक भागीदार अमित भारत रासणे यास धनादेश अनादरीत खटला प्रकरणी दाखल दाव्याच्या निकालात २१ लाख रुपयांचा दंड व १ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा अकोले न्यायालयाने सुनावली आहे.

अकोले येथील तदर्थ दोन न्यायालयाचे फौजदारी व दिवाणी न्यायाधिश राहुल गायकवाड यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात आरोपी अमित भारत रासणे याच्यावर धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्यातीत दोन्ही बाजूकडील पुरावे, साक्षीदार व युक्तीवाद ऐकून मे.न्यायाधीश यांनी हा निकाल दिला आहे यावेळी आरोपीस न्यायालयाने ठोठावलेली २१ लाख रुपये दंडाची संपूर्ण रक्कम अकोले न्यायालयात भरण्यास एका महिन्याची मुदत दिली आहे. या खटल्यात फिर्यादीकडून वकील एन. के. खतीब यांनी काम पाहिले.

याबाबतची हकीगत अशी की, अमित रासणे याच्या मालकीचे अकोले शहरातील बाजारपेठेत गाळा मिळकत नंबर २४०/२ व २४०/३ या फिर्यादी विजय काशिनाथ पोखरकर यांना विश्वासात घेऊन विकण्याचा व्यवहार झाला. खरेदी विक्री व्यवहारात आरोपीने विसारापोटी फिर्यादीकडून मिळकतीवरील दि संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा अकोलेचे कर्ज असल्याने ते भरण्यासाठी १५ लाख रूपयांची रक्कम विसारपावतीवर विसारापोटी घेतली. बँक कर्ज भरणा केल्यानंतर गाळे खरेदी दुय्यम निबंधक कार्यालयात करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र यानंतर प्रत्यक्षात सदरचे गाळे आरोपीने विसारपावतीनुसार ठरवल्याप्रमाणे फिर्यादीस विक्री न करता त्रयस्थ व्यक्तीस परस्पर विक्री केले. याची माहीती मिळाल्यावर आपली फसवणूक केल्याबद्दल फिर्यादीने आरोपीस मी तुमच्या विरूद्ध फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई करील असे सांगितल्यानंतर आरोपी अमित रासणे याने फिर्यादीस मी तुमची पुर्ण रक्कम परत करतो असे सांगून तडजोड घडवून २० लाख ४५ हजार रुपयांचा नगर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, शाखा अकोलेचा स्वतःच्या खात्यावरील धनादेश क्रमांक ००१८०६४ हा फिर्यादीस देणे रक्कम वसूल करण्यापोटी दिला. सदरचा धनादेश वटविण्यासाठी बँकेत भरल्यानंतर आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला.

यामुळे फिर्यादीने आरोपी अमित रासणे याच्याविरुद्ध चलनक्षम पत्रक कायदा १८८१ चे कलम १३८ प्रमाणे अकोले न्यायालयात सं. क्रीम. केस नंबर ५९|२०१६ नुसार खटला दाखल केला. या खटल्याचे कामकाज अकोल्याचे तत्कालीन फौजदारी व दिवाणी न्यायाधिश एस. एस. काळे व विद्यमान तदर्थ दोनचे फौजदारी व दिवाणी न्यायाधिश राहुल गायकवाड यांच्या समोर चालले. यात फिर्यादी व आरोपीकडून आवश्यक पुरावे दाखल करण्यात आले. आरोपीने त्याच्या पुराव्यात उभय दोघांत कोणतीही विसार पावती झालेली नव्हती, तसेच त्याने पुर्वीच्या व्यवहारापोटी सदरचा धनादेश फिर्यादीस दिला होता व त्याचा गैरवापर फिर्यादीने केला असा बचाव घेतला. तर फिर्यादीकडून रूपये २० लाख ४५ हजाराचा धनादेश हा फिर्यादीस गाळे विक्री व्यवहारापोटी आरोपीने विसारपावतीनुसार दिलेला होता आणि आरोपी हा कायदेशिरपणे फिर्यादीस हे देणे लागत आहे. तसेच फिर्यादीने विसाराची रक्कम रूपये १५ लाख दिल्याबाबतचे आवश्यक ते सर्व पुरावे न्यालयात दाखल केले. आरोपी अमित रासणे हा फिर्यादीस रूपये २० लाख ४५ हजारांची रक्कम कायदेशिर देणे लागत आहे, याबाबत फिर्यादीचे इन्कम टॅक्स रिटर्न, विसार पावती व त्याबाबतचे व बँकेचे साक्षीदार न्यायालयासमोर तपासून आरोपीने फिर्यादीस कायदेशिर देण्यापोटीच सदरचा धनादेश दिलेला होता असे सिद्ध केले.

याशिवाय आरोपीने घेतलेला बचाव कसा योग्य व कायदेशिर नाही हेदेखील फिर्यादीच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचे पुरावे, साक्षी व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायाधिश राहुल गायकवाड यांनी २८ जानेवारीस या खटल्यातील निकाल घोषीत केला. निकालात चलनक्षम पत्रक कायदा १८८१ चे कलम १३८ प्रमाणे आरोपीने कायदेशीर देणे देण्यापोटी धनादेश दिलेला असून आरोपीने फिर्यादिस धनादेशाची रक्कम अदा केली नाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५ (२) अन्वये १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ३५७ (३) नुसार फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून २१ लाख रुपयांंची रक्कम द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल सुनावला. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने वकील एन. के. खतीब यांनी काम पाहिले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!