सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात तरुणांचे आयकॉन
डॉ. सुधीर तांबे…
स्वतंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी एकवटला होता. सर्वच तरुण देश प्रेमाने आणि देशासाठी त्याग करण्याच्या उद्देशाने भारावून गेले होते. 1942 च्या चलेजाव आंदोलनात भाऊसाहेबांनी भाग घेतला त्यावेळेस त्यांचे वय अवघे 18 वर्षे होते. अत्यंत साहसी व धाडसी वृत्तीने त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. मात्र आजच्या तरुणांना असे वाटते आहे की राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु असे नाही चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले राजकारण गरजेचे असते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाऊसाहेबांनी डावी व साम्यवादी विचारसरणी जोपासत गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजे याकरता स्वतःच्या देशात असल्यास सरकार विरुद्ध बंड पुकारले. मात्र साम्यवादी विचाराचा अतिरेक होतो आहे हे लक्षात घेऊन डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब थोरात यांनी कम्युनिस्ट विचार सोडला.

राष्ट्रपिता महात्मा गांधींना स्वातंत्र्य नंतर स्वराज्य निर्माण करायचे होते देशातील शेवटच्या माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे हाच विचार घेऊन यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कृषी औद्योगिक क्रांती राबवली गेली यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब थोरात यांना हा विचार अधिक योग्य वाटला व हीच विचारधारा कायम ठेवून त्यांनी संगमनेर तालुक्यात काम करण्याचा निर्णय घेतला.
राज्यात सर्वात दुष्काळी अहमदनगर जिल्हा आणि त्यामध्ये सर्वात दुष्काळी असा संगमनेर तालुका या तालुक्याच्या विकासासाठी आपण काय करू शकतो याचे सखोल चिंतन केले.

तालुका हा बिडी कामगारांचा तालुका अशी ओळख होती अत्यंत दुष्काळी आणि गरीब परिस्थितीमुळे येथील माणसांचे शरीर दुबळे झाले होते अनेक जण टीबी सारखे आजाराने ग्रस्त होते अशा माणसांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठी भाऊसाहेबांनी दृढ चिंतन करून एखाद्या अर्थतज्ञ सारखा विचार करत या तालुक्याच्या विकासाची आखणी केली.

गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती यावी याकरता संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना निर्माण केला या कारखान्यासाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांची मोठी मदत झाली . कारखाना स्थापनेपूर्वी अनेक शिष्टमंडळांनी परिसराची पाहणी करता या विभागाला भेट दिली दुष्काळी परिस्थिती असल्याने मान्यता देण्यास अडचण येत होती परंतु डॉक्टर अण्णासाहेब शिंदे केंद्रात कृषिमंत्री असल्याने त्यांचे मोठे मदत होऊन कारखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली. जुनी मशिनरी आणून घुलेवाडीच्या मार्गावर कारखाना सुरू झाला भाऊसाहेब स्वतः दररोज कारखान्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करायचे अडचणीतून मार्ग काढायचे हळूहळू कारखाना सुरू झाला. मात्र उसाचा मोठा प्रश्न होता. भाऊसाहेब यांना अर्थशास्त्राची चांगली जाणीव असल्याने त्यांनी जिल्हा बँकेत आणि एम एस सी बँकेतही अनेक वर्ष काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर पाईपलाईनचे मोठे जाळे निर्माण करून उसाची निर्मिती केली. कारखान्यातून फक्त इंडस्ट्रियल अल्कोहोलच उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

फक्त शेतीवर शेतकऱ्यांची गुजरात अवघड होते आहे म्हणून शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिले. डॉक्टर आण्णासाहेब शिंदे हे खरे तर शास्त्रज्ञ प्रामाणिक संशोधक होते त्यांनी संकरित बियाणे आणले संकरित गायी आणल्या देशांमध्ये दुग्ध क्रांती घडून आली. हीच क्रांती भाऊ साहेबांनी संगमनेर तालुक्यात राबवून शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा दिला. याचबरोबर शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्नही घेतले. हे सर्व करताना भाऊसाहेबांनी तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांना काटकसरीचे संस्कार दिले शिस्त आणि काटकसरीतून उभ्या केलेल्या संस्था आज देशात आदर्शवत ठरत आहे गोरगरिबांच्या कष्टाचा व घामाचा एक एक पैसा वाचून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण केली.

शेतकऱ्यांना हक्काचे पतपुरवठा करण्याची साधने असावी यासाठी जिल्हा बँकेच्या उभारणीत मोठे योगदान दिले 48 वर्षे ते या बँकेचे संचालक राहिली तसेच अठरा वर्षे चेअरमन म्हणून काम केले कुशाग्र बुद्धी आणि अर्थशास्त्राची बारीक जाणे यामुळे राज्य बॅंकेचे नेतृत्वही त्यांनी केले सहकारामध्ये कुठेही गैरप्रकार त्यांनी कधीही खपवून घेतला नाही चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अत्यंत कठोर भूमिका घेतली. तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी ही यांच्यावर त्यांचा नैतिक दरारा होता या शिस्तीच्या वातामुळे वातावरणामुळे संगमनेरच्या सहकारी संस्था खूप चांगल्या सुरू आहेत.

शेतकऱ्यांच्या मुलाची प्रगती केवळ शेतीवर होणार नाही हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांनी तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडून आली आपल्या ग्रामीण भागातील मुलांना उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे याकरता इंजिनिअरिंग कॉलेज पॉलीटेक्निक मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज असे महाविद्यालय काढून मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली यामुळे संगमनेर तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील अनेक मुले उच्च शिक्षण घेऊन देशात विदेशात चांगल्या पदावर काम करत आहेत.

ग्रामीण विकासाबरोबर सहकार आणि शैक्षणिक क्रांती करून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला त्यांचे मन आमदारकीमध्ये रमले नाही आमदारकीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी संगमनेर औद्योगिक वसाहतीची स्थापना केली शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण कृषी प्रगती उद्योग प्रगती समृद्ध बाजारपेठ अशी चौफेर प्रगती त्यांनी तालुक्याची साधी त्यामुळे दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलून आता विकसित तालुका निर्माण झाला आहे जेथे चारशे मिलिमीटर सुद्धा पाऊस पडत नाही तो तालुका प्रगतशील झाला आहे. हीच रचनात्मक वाटचाल मा मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आज संगमनेर तालुका हे विकासाचे आणि सहकाराचे मॉडेल निर्माण झाले आहे.

प्रतिकूलतेतून उभा राहिलेला तालुका चांगल्या नेतृत्वामुळे किती विकसित होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका ठरला आहे आज संगमनेरचे नाव प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहे शिक्षण सहकार व्यापार सांस्कृतिक वातावरण समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे यामागे भाऊसाहेब थोरात यांची दूरदृष्टीच आहे.

अर्थतज्ज्ञांनी सुद्धा या रचनात्मक वाटचालीचा अभ्यास करावा अशी संगमनेर तालुक्याच्या विकासाची इमारत भाऊसाहेब थोरात यांनी उभी केली आहे. या विकास मॉडेल चे संपूर्ण देशाने अनुकरण करावे असे हे काम असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या सखोल सामाजिक चिंतनातून हे निर्माण झाले आहे त्यांचे जीवन कार्य खऱ्या अर्थाने तरुण पिढीला मार्गदर्शन करणारे आहे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम
डॉ. सुधीर तांबे
MS सर्जन… माजी आमदार
