आमदार खताळ समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा जुंपली !
आता त्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
संगमनेर दि. 5
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर खताळ समर्थक कार्यकर्ते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्यानंतर ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भगत यांनी दोन खताळ समर्थक (सुयोग गुंजाळ, राहुल भोईर) फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. आता दीपक भगत आणि त्यांचे सहकारी साहेबराव वलवे यांच्याविरुद्ध त्या दोन समर्थकांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुयोग गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगत व वलवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे संगमनेर येथील विश्रामगृहावर आले असताना त्यांच्या स्वागताकरिता विश्रामगृहावर माझ्या सहकाऱ्यांसोबत गेले असता. दीपक भगत व साहेबराव वलवे यांनी मला व माझे मित्र राहुल भोईर यांना धक्का देऊन विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यास मी व माझ्या मित्रांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला कुटुंबांवरून अश्लील शिवीगाळ करून तुम्हा दोघांनाही जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली व आमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून दीपक वसंतराव भगत यांच्यासह साहेबराव वळवे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे दोन्ही गटांना मैदान मोकळे...
आमदार अमोल खताळ समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील भांडखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ती थेट आता पोलीस ठाण्यात गेली आहे. पोलिसांनी देखील दोन्ही गटांना खुले मैदान दिले असून ‘तुम्ही फिर्यादी देत रहा आणि गुन्हे दाखल करू’ असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे एकमेकांविरुद्ध तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याचा उद्योग सुरू झाला आहे.
