भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आमदार समर्थकांवर गुन्हा दाखल…
संगमनेर गेस्ट हाऊस राडा
संगमनेर दि. 4
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगहावर उपस्थित असताना भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला खताळ समर्थकांनी धक्काबुक्की व मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले आणि त्याचा परिणाम म्हणून आज अखेर मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे संगमनेर मार्गे त्र्यंबकेश्वर कडे जात असताना संगमनेर विश्रामगृहावर थांबले होते. थोडा वेळच उपस्थित असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची बैठकीच्या वेळी त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ देखील उपस्थित होते. या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि खताळ यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही दिवसात सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टवरून भाजपच्या त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला विश्रामगृहात आणि बाहेर धक्काबुक्की शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर अशी कुठलीच घटना घडली नसल्याचा निर्वाळा काही मंडळींनी परस्पर दिला. मात्र भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली.

या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भगत यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भगत हे विश्रामगृहावर गेले असता ही घटना झाली आहे. विश्रामगृहाच्या पायऱ्या उतरत असताना सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांनी त्यांना धक्का दिला. त्यावरून त्यांनी धक्का देऊ नका, माझी तब्येत बरी नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर विश्रामगृहाच्या बाहेरच असलेली मोटरसायकल घेत असताना त्या दोघांनी दीपक भगत यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांना त्रास झाला. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी भगत यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने ते येथील खाजगी रुग्णालयात देखील दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबा वरून सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

