टोल नाक्यावर गुंडागर्दी – मारहाण करणाऱ्या पाच जणांना पकडले ; चौघांना पोलीस कोठडी

संगमनेर दि. 2

माजी नगराध्यक्ष दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांच्या तीन मुलांसह त्यांच्या मित्राला नाशिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर गुंडागर्दी करत कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. संगमनेरकरांच्या संतापानंतर आणि मोर्चानंतर सुस्तावलेली तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा अखेर जागी झाली. वाहनाला धडक देणाऱ्या या घटनेतील पाच आरोपींना नाशिकमधून गुरुवारी पकडल्याची माहिती समाज माध्यमात प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या या प्रकारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व प्राणघातक हल्ल्याचे कलम पोलिसांनी या गुन्ह्यात वाढवावे. टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा या मागणीसाठी संगमनेर व्यापारी असोसिएशनसह सर्व पक्षीय संगमनेरकरांनी प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला होता.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्वपक्षीय शेकडो पदाधिकारी संगमनेरकर या मोर्चात सहभागी झाले होते. दोन्ही आमदारांनी या घटनेला संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक जबाबदार असल्याचे आरोप केले होते.

संगमनेरकरांच्या संतापानंतर अखेर जाग आलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नासिकमध्ये असल्याचे पथकाला समजले. पथकाने नाशिकमध्ये जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली असता त्यांना प्रथमेश धनंजय जाधव, संदीप राजाराम जाधव, जयेश बंडू भोर, गणेश भीमराव लोणे यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत या पाचही आरोपींनी गुन्हा केला असल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले आहे. यातील चौघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

असे असले तरी जखमी कासट यांनी दिलेल्या फिर्यादीतील आरोपी पोलिसांना अद्याप आढळून येत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तालुका पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. कासट बंधूंनी ज्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा आरोप केला ते आरोपी अद्यापही मोकाट आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे या आरोपींपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!