दोन धर्मात तेढ निर्माण व्हावी यासाठी अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल !
संगमनेर शहर पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज
प्रतिनिधी —
विधानसभा निवडणुकीचा पूर्व काळ आणि आता विधानसभा निवडणुकीनंतर आणि भविष्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या आधी संगमनेर शहरात पुन्हा दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून एका विशिष्ट धर्माविषयी व्हाट्सअप द्वारे सोशल मीडियावरून मेसेज पसरविले जात आहेत. यावर शहर पोलिसांनी लवकरात लवकर आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

सध्या व्हाट्सअप वरून एक मेसेज व्हायरल होत असून शहरातील एका विशिष्ट चौकात एका विशिष्ट समाजाची दुकाने आहेत. या दुकानात आलेल्या महिलांना वस्तू मिळवून देण्यासाठी व आवडत्या वस्तू मिळवण्यासाठी संबंधित महिलांकडून त्यांचे मोबाईल नंबर घेतले जातात. नंतर त्यांना मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून त्रास दिला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी खरेदी करू नका, आपल्या घरातल्या महिलांना त्या ठिकाणी पाठवू नका अशा स्वरूपाचा व्हाट्सअप मेसेज पसरवला गेला आहे.

असे मेसेज पाठवण्याचे प्रमाण मोठे असून या मेसेजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन धर्मात तेढ निर्माण होऊन वाद होऊ शकतो. संवेदनशील संगमनेर शहर गेल्या अनेक वर्षांपासून शांत आहे. मात्र आता पुन्हा या शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रकार सुरू झाला आहे की काय असा संशय व्यक्त होत आहे. दंगलीचे शहर म्हणून ओळख पुसलेले संगमनेर शहर पुन्हा दंगलीचे शहर होणार काय ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. राजकीय फायद्यासाठी विशिष्ट विचाराच्या मंडळींकडून असे उद्योग केले जात असल्याचे आरोप होत आहेत. तरी पोलिसांनी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावे अशी मागणी सर्वसामान्य शांतताप्रिय सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

