गावठी पिस्तुलासह एकाला पकडले !
31 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी —
संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने शहरातील कुरण रोड परिसरात एका व्यक्तीला गावठी पिस्तुलासह पकडले असून त्याच्या ताब्यातील 31 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसमास अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

आशिष सुनील दत्त महिरे (वय 28 वर्षे, मूळ राहणार सातपूर, तालुका जिल्हा नाशिक, हल्ली राहणार गोल्डन सिटी, संगमनेर, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना संगमनेर शहरातील कुरण रोड या परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पंचांना बोलावून घेऊन करण रोड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

कुरण रोड परिसरातील आझादनगर गल्ली नंबर २ समोरील रस्त्यावर एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील टोयाटो फॉर्चूनर गाडी क्रमांक एम एच 15 एफ 9630 या गाडीसह रस्त्याच्या कडेला संशयितरित्या दिसून आला. सदर व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याचे नाव आशिष महिरे असल्याची त्याने सांगितले. त्याची अंग झडती आणि गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटच्या खाली सिल्व्हर रंगाचे लोखंडी धातूचे गावठी पिस्तूल मिळून आले. त्याविषयी चौकशी केली असता संबंधित संशयित व्यक्तीकडे कुठलाही शस्त्र परवाना नसल्याचे अधिक माहिती मिळाली. त्यामुळे आशिष महिरे या संशयताला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मुद्देमाल अस्तगत करण्यात आला.

यामध्ये 50 हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाची त्यावर काळ्या रंगाची पट्टी असलेला आणि सोबत मॅक्झिन असलेली गावठी पिस्तूल तसेच 30 लाख रुपयांची सिल्व्हर रंगाची टोयाटो फॉर्चुनर गाडी, 1 लाख रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन मोबाइल, 40 हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाइल, 10 हजार रुपये किमतीचा रियल मी कंपनीचा मोबाइल आणि 20 हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाइल असा एकूण 31 लाख 70 हजार रुपयाची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस नाईक राहुल कचरू डोके (नेमणूक विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून सदर आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

