६३ लाखांच्या ‘विदेशी दारूचे खोके’ पळविणारे चोरटे अद्याप गायब !
ट्रक पलटी करणारा चालक देखील पसार ; खोके ‘गुप्त’ करण्यात एका संघटनेचा सहभाग
प्रकरणाची कसून चौकशी करा, सर्वकाही संशयास्पद — भाजप नेते जालिंदर वाकचौरे
संगमनेर तालुका पोलिसांचा तपास सुरू आहे ; उत्पादन शुल्क – दारूबंदी खाते मात्र निवांत
प्रतिनिधी —
लाखो रुपयांचे विदेशी मद्य घेऊन निघालेला एक मोठा ट्रक संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात संगमनेर – अकोले तालुक्याच्या बॉर्डरवर एका ओढ्यात पलटी झाला. या ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे खोके आजूबाजूच्या लोकांनी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रकचा चालक आणि दारू घेऊन पळालेले चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. नाशिकहून पुण्याकडे जाणारा हा ट्रक मुख्य महामार्गाने न जाता ग्रामीण भागात घुसलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मॅकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्याचे बॉक्स घेऊन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 12 एल टी 73 29 हा पुणे येथे डिलिव्हरी देण्यासाठी जाणार होता. मात्र पुणे नाशिक अश्या सरळ सरळ महामार्गावरून हा ट्रक न जाता संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात कानवडे वस्ती जवळ पलटी झाला आणि त्यातील दारूचे बॉक्स विखुरले गेले. ते आजूबाजूच्या लोकांनी चोरून नेले. तसेच संगमनेर आणि अकोले तालुक्याशी संबंधित एका सुप्रसिद्ध संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील यातील शेकडो दारूचे बॉक्स नेल्याची चर्चा आहे.

दारूच्या कायदेशीर नोंदणी बाबत साशंकता ! महत्त्वाचे कागद गायब..
विशेष म्हणजे ट्रक पलटी झाल्यानंतर या ट्रकचा चालक हा पसार झाला आहे आणि त्याचबरोबर ट्रक सोबत असलेल्या कागदपत्रांमध्ये टीपी पावती देखील गायब आहे. टीपीची मूळ पावती गायब असल्याने माला संबंधीची नियमबद्ध, कायदेशीर माहितीची उकल होण्यास अडचण येत आहे. नेमकी मालाची टीपी पावती बरोबर होती की नव्हती ? किंवा माल नोंदणी केलेला होता की नव्हता ? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. ट्रकच्या मूळ मालकाचा पत्ता व चालकाचा देखील शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील स्पॉटवर गेले होते. कुठेतरी पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.

प्रकरणाची कसून चौकशी करा — जालिंदर वाकचौरे (भाजप नेते)
दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी अनेक शंका उपस्थित केल्या असून पुणे नाशिक महामार्गावरून न जाता ही गाडी आडमार्गावर आणि ग्रामीण भागात आलीच कशी ? यासंदर्भात उत्पादन शुल्क संबंधित अधिकारी स्पष्ट माहिती न देता उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे या प्रकरणात सर्व काही संशयास्पद असून याचा तपास आणि चौकशी कसून करावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

चोरी गेलेल्या मालामध्ये मॅकडॉल नंबर वन सुपर स्पेशल व्हिस्की ओरिजनल चे ९३३ बॉक्स (63 लाख 8 हजार 13 रुपये) चोरून नेण्यात आले असल्याची फिर्याद विजय संजय कडाळे (वय वर्ष 28, मूळ राहणार कोटमगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, हल्ली राहणार हनुमान ट्रेडर्स, तिरंगानिया कंपनी, द्वारका, नाशिक, जिल्हा नाशिक) यांनी दिली आहे. मात्र फिर्यादीत नोंदविल्या पेक्षा जास्त दारूचे बॉक्स चोरीला गेले असल्याची चर्चा आहे. तर यामध्ये संशयित असलेला आरोपी अजय शांतवन टकवाले (राहणार चितेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हा पसार झालेला आहे.

