एसटी महामंडळाकडून गोरगरीब विक्रेत्यांवर अन्याय…
संघर्ष सामाजिक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर दि. 5
बस स्थानकाच्या आवारात गोळी, बिस्किट, वडापाव, पाणी बॉटल व इतर खाद्यपदार्थ आणि वस्तू विकून पोट भरणाऱ्या गोरगरीब व्यवसायिकांचा करार मोडून त्यांना अचानक तोंडी सूचना देऊन काम बंद करण्यास सांगितल्याने संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. संग्राम जोंधळे यांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

संगमनेर बस स्थानकाच्या आवारात सुमारे १८ युवक एसटी बस आल्यानंतर प्रवाशांना बिसलेरीच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटे, वेफर्स, चॉकलेट इत्यादी आवश्यक पदार्थ व पाणी विकत असतात. त्यासाठी एसटी महामंडळाने या युवकांशी दरवर्षी करार करून परमिट दिलेले असते. या परमिटची वार्षिक रक्कम रूपये ११४५० या प्रत्येक विक्रेत्याकडून एसटी महामंडळ घेत असते.

या वर्षीचा परवाना हा मार्च २०२४ ते मार्च २०२५ अशा कालावधीसाठी आहे, परंतु अचानक संगमनेर एसटी डेपो मॅनेजर यांनी या युवकांचा व्यवसाय बंद करण्यास तोंडी सांगितले, त्यामुळे या युवकांनी संघर्ष सामाजिक संघटनेकडे संपर्क साधून याबाबत न्याय मिळण्याची मागणी केली, असता संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक तसेच शासना मार्फत निवडले गेलेल्या पथविक्रेते समितीचे सदस्य ॲड.संग्राम जोंधळे, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर यांनी या युवकांना सोबत घेऊन याविषयी डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा केली परंतु डेपो मॅनेजर यांनी उडवाऊडविचि उत्तरे दिले.

वास्तविक, करार बंद केल्याची नोटीस या युवकांना दिलेली नाही. तसेच कराराची मुदत संपलेली नाही. अशी विचारणा डेपो मॅनेजरला केली असता, आम्हाला जिल्हा कार्यालयाकडून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संघटनेने या आदेशाची लेखी प्रत मागितली परंतु आम्हाला लेखी प्रत आलेली नाही, फोनवरून आदेश आले असे त्यांनी सांगितले .

डेपो मॅनेजर यांनी अशा प्रकारे बेजबाबदार उत्तरे दिल्याने हा व्यवसाय चालू ठेवावा असे संघर्ष संघटनेने या युवकांना सुचित केले आहे, कारण या युवकांच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे. कराराचे पैसे दिलेले आहेत, मुदत संपलेली नाही.हा व्यवसाय उन्हा तान्हात एसटी बसच्या मागे पळत पळत जाऊन करावा लागतो, यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते हा व्यवसाय बंद करून अचानक दुसऱ्या व्यवसायाची कोणतीही सोय नाही, त्यामुळे हा व्यवसाय चालू ठेवावा तसेच यापुढे अधिक तीव्र आंदोलन तसेच इतर वेगळ्या मार्गाने या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष संघटना प्रयत्न करील अशी ग्वाही संघटनेने या युवकांना दिली आहे .
