राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा संघ उपविजेता !
संगमनेर दि. 4
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराच्या स्पोर्ट्स कराटे असोसिएशनने उपविजेतेपद पटकावले. देशभरातील साडेबाराशेहून अधिक कराटेपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गीता परिवाराच्या नियमित कराटे वर्गातील 121 स्पर्धक सहभागी झाले होते. कराटेच्या विविध तीन प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत गीता परिवाराने 32 सुवर्ण, 80 रौप्य आणि 118 कांस्य पदकांसह 230 पदकांची लयलुट करीत ही स्पर्धा गाजवली.
पुण्यातील ओकिनावा मार्शल आर्ट्स अकादमीच्या दत्ता शेलार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामीळनाडू, केसळ, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा अशा देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून 1 हजार 250 कराटेपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात गीता परिवाराच्यावतीने संगमनेरात नियमित घेतल्या जाणार्या कराटे प्रशिक्षणवर्गातील 121 स्पर्धकांचा समावेश होता. कराटेच्या कुमिते, काता आणि समूह काता-कुमिते अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
हैद्राबाद येथील एस.श्रीनिवासन आणि रमेश यांनी स्पर्धेचे पंच म्हणून भूमिका पार पाडली. तर, गीता परिवाराच्या दत्ता भांदुर्गे, प्रमोद मेहेत्रे, विकास गुंजाळ, राजेश रहाणे, आशुतोष गायकवाड, ऋषिकेश कडूस्कर, ओम जोर्वेकर, प्रज्ज्वल कानवडे, नम्रता निमसे व शुभम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत गीता परिवाराच्यावतीने काता प्रकारात आरव कासट, उर्जिता शिंदे, गौरव गुंजाळ, दिव्या कोकणे यांनी तर, कुमिते प्रकारात आर्य बंगाळ, आराध्या गुंजाळ, वेदांती शिंदे, संस्कृति ढोले,
कौस्तुभ वाजपेयी, विनित जांगीड, ध्रुव कदम, सिद्धी जाधव, माधवी दातीर, ईश्वरी पांडे, सान्वी भांगरे, साइशा कानवडे, अनुरती कानवडे, यादन्या भावसार, संयुक्ता रहातेकर, दूर्वा ढोले, त्रषिकेश जाधव, नितिन उदमले व वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदकांची कमाई करीत गीता परिवाराच्या संघाला उपविजेते पद मिळवून दिले. या संपूर्ण स्पर्धेंत उत्कृष्ट कामगिरी करणार्या गीता परिवाराच्या कराटेपटूंनी 32 सुवर्ण, 80 रौप्य च 118 कांस्य पदकांसह 230 पदकांची लयलुट करीत ही स्पर्धा गाजवली. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवणार्या सर्व खेळाडूंचे गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.