वीरगाव शाळेत निनादले
जपानी लोकगीताचे सूर !
रेईको साकानोई यांनी साधला विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
अकोले दि. 2
‘सर्वांशी प्रेमाने वागा, निराश न होता स्वत:ला सतत आनंदी ठेवा…’ असा सल्ला देत जपानमधील लोकांच्या जेवणातील खाद्य पदार्थ, त्यांच्या आनंदी, दीर्घ आयुष्यामागील रहस्य उलगडून सांगताना, आयुष्यातले स्वयंशिस्तीचे महत्त्व सांगत, विद्यार्थ्यांकडून तीन वचने घेत जपानमधील कादंबरीकार, संगीतकार रेईको साकानोई यांनी वीरगाव शाळेतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. भारतीय शास्रीय संगीतातील एक बंदिश केलीच खेरीज जपानमधल्या लोकगीताचे कर्णमधुर सूर वीरगाव शाळेत निनादले… टाळ्यांचा गजर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली…
जपानमधील कादंबरीकार, संगीतकार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योजक रेईको साकानोई यांनी नुकतीच वीरगाव शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी सहज सुंदर संवाद साधला. रेईको यांच्या बोलण्याचे प्रा. डॉ. मुग्धा महाले यांनी भाषांतर केले. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शैला भोईर, विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे यावेळी उपस्थित होते.
 रेईको यांनी यावेळी विद्यार्थ्यांकडून तीन वचने घेतली. आई-वडील, शिक्षक आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान करू. समाजाने, देशाने मला काय दिले? याचा विचार करण्यापेक्षा मोठे होऊन आम्ही देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू, देशाबद्दल अभिमान बाळगू. पृथ्वी आपली सगळ्यांची आई आहे, आपण सारे तिची लेकरे आहोत. जगभरातील सर्व माणसांशी बंधुभावाने आणि प्रेमाने वागू. जपानमधील शाळेची वेळ, तेथील खाद्य संस्कृती, आनंदी जीवनाचे रहस्य याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची रेईको यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
जपानी संगीतकार असलेल्या रेईको गेली दोन वर्षे भारतीय शास्रीय संगीत शिकत आहेत. त्यांनी संस्कृतमधील गीत सदर करत सर्वांची मने जिंकली. शाळेला भेट देऊन आनंद झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. कंटाळा न करता मुलांसोबत सेल्फी, फोटो घेतले. केवळ परीक्षेसाठी अभ्यास न करता जीवनासाठीचे शिक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी शाळांनी प्रयत्न केले पाहिजेत मत प्रा. डॉ. मुग्धा महाले यांनी व्यक्त केले. रेईको यांच्या मागणीनुसार शाळेतील विद्यार्थिनीनी समूहगीत सदर केले. हार्मोनियमवर साथ देणाऱ्या अबोली ढमाले हिचे त्यांनी कौतुक केले. मुग्धा महाले यांनी परिचय करून दिला. भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले. भास्कर आंबरे यांनी आभार मानले. सुरेश आरोटे, रावसाहेब सरोदे, मीनल चासकर, वैजयंता आंबरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
Oplus_131072

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!