श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचे उद्घाटन
संगमनेर दि. 9
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि माणुसकी यांचे नाते घट्ट आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून माणुसकी जपणारी पिढी तयार होत असते.असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सोमनाथ सातपुते यांनी केले. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुंजाळवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारणी सदस्य महेश डंग, शालेय समिती सदस्य दिलीप सांगळे, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल गुंजाळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक,पर्यवेक्षक अप्पासाहेब गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नीतेश सातपुते उपस्थित होते.

डॉ.सातपुते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक अत्यंत नम्र, इतरांविषयी आदर बाळगणारा, महिलांविषयी सन्मानाची भावना ठेवणारा,राष्ट्राच्या हितासाठी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेणारा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.असे सांगून महाविद्यालयीन प्रवास करत असताना आपण प्रगतशील दृष्टिकोन ठेवला पाहिजे. सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्या जगण्यात नैतिकता ठेवून माणसांच्या कल्याणासाठी आपण वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी आपण जगतच असतो परंतु दुसऱ्यासाठी आपल्याला जगता आले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नीतेश सातपुते, परिचय प्रा.दिगंबर मुळे,सूत्रसंचालन प्रा. स्नेहल गायकवाड व प्रा. किरण देशमुख आणि आभार प्रा.सचिन कानवडे यांनी मानले.

