आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून आयटीआय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशकांचे प्रलंबित प्रश्न संदर्भात आज व्यवसाय शिक्षण व शिक्षण संचालनालय मुंबई येथे आमदार सत्यजित तांबे यांची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक श्रीमती माधुरी सरदेशमुख मॅडम यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिल्प निदेशक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने नाशिक विभागातील शिल्प निदेशकांच्या वेतन निश्चिती व सेवा विषयक अन्यायकारक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी सत्यजित तांबे म्हणाले कि, शासन निर्णय तसेच दिनांक 16 ऑगस्ट 2024 च्या मार्गदर्शक पत्रानुसार “अभावित सेवा” ही संज्ञा स्पष्ट असून, वेतन निश्चिती करताना मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा, असा निर्णय आधीच झालेला आहे. इतर विभागांनी त्यानुसार सकारात्मक निर्णय घेतला असताना नाशिक विभागाने मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तातडीने योग्य निर्णय घेण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

तसेच यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेचे सर्व लाभ देणे, विविध योजनांमधील वेतनातील अनियमितता दूर करून पदांचे “Plan” मधून “Non-Plan” मध्ये रूपांतर, “आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षण” योजनेतील कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा लाभ देणे, नवीन सेवा नियमांमुळे गणित व चित्रकला निदेशकांच्या सेवाजेष्ठतेतील अन्याय दूर करणे या सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संचालक स्तरावर स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.
