निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान केंद्र कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ

अहिल्यानगर प्रतिनिधी —

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान केंद्रासाठी नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सरमिसळ प्रक्रियेस निवडणूक निरीक्षक ताई के, हौलीनलाल गौईटे, अरुण कुमार, डी. रथ्ना, कविथा रामू, श्रीमती रंजीता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जी. एन.नकासकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाकरिता होणाऱ्या मतदानाकरिता मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे २७ ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. आज या सर्व कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. प्रथम प्रशिक्षणास अनावश्यकपणे अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविणे अथवा लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदी नुसार करवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

आज मनुष्यबळाच्या सरमिसळ प्रक्रियेबाबत मतदान पथक निश्चित करण्यात आले, तसेच प्रत्येक मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा दहा टक्के अधिक पथकांसाठी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. या पथकांना १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी तिसऱ्या सरमिसळ प्रक्रियेद्वारे मतदान केंद्र निश्चित करून देण्यात येतील.

मनुष्यबळाची सरमिसळ करून कर्जत मतदासंघांसाठी ३९६, श्रीगोंदा ३८३, अहमदनगर शहर ३३०, पारनेर ४०७, राहुरी ३४३, शेवगाव ४१०, कोपरगाव ३०३, नेवासा ३०७, संगमनेर ३२१, शिर्डी ३०४, श्रीरामपूर ३४६ आणि अकोले मतदासंघांसाठी ३४२ पथके निश्चित करण्यात आली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे नकासकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *