संगमनेर विधानसभा मतदारसंघ…
तहसीलदारांकडून जमीन केली नियमबाह्य बिगर शेती !
मंत्र्यांच्या नावाचा वापर करून महसूल विभागावर दबाव आणणारा तो उमेदवार कोण ?
तक्रारीची चौकशी सुरू आहे — महसूल विभाग
प्रतिनिधी —
संगमनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना आणि सर्वत्र राजकीय रणधुमाळी उठलेली असताना एका उमेदवाराचे नियमबाह्य बिगर शेती जमीन (चौकशी) प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. महसूल विभागावर दबाव आणणारा तो उमेदवार कोण ? अशी चर्चा आता संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे. त्यातच काँग्रेसचे विक्रमसिंह खताळ पाटील यांनी देखील महसूल विभागातल्या अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत या बिनशेती जमीन प्रकरणावर टीका केली असल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

संगमनेर तालुक्यातील एका गाव शिवारात एका तथाकथित भक्त उमेदवाराने महसूल विभागावर दबाव आणत विशेषत: तहसीलदारांवर राजकीय दबाव आणत ग्रीन झोन मध्ये असलेली सुमारे ४ एकर शेतजमीन बिगर शेती केली आहे. पत्नी भाऊ आणि भावजय यांच्या नावावर ही जमीन घेण्यात आली आहे. या संदर्भात येथील एका शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर जमीन विभागीय नियोजन नकाशा मध्ये ‘ग्रीन झोन’ दर्शविण्यात आलेली आहे. नियोजन अधिकारी, अहिल्यानगर यांची परवानगी घेतलेली दिसून येत नाही. तसेच भूखंड निहाय अकृषिक अकारणीबाबत सक्षम अधिकारी यांचा आदेश किंवा सनद घेतलेली नाही. असे असताना सदर जमीन दबाव तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या बिगर शेती करण्यात आलेली आहे.
by
त्याचप्रमाणे तक्रारीत असे म्हटलेले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल कलम 1966 मधील कलम आणि नियमान्वये केलेल्या सुधारित तरतुदीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसुल प्राधिकारी व अधिकारी यांनी अंतिम विकास योजना प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम 121 खालील घोषित अधिवास पासून 200 मीटरच्या परीघिय क्षेत्रात रहिवासी अकृषीक वापर करता येतो. परंतु सदरचा सर्व्हे नंबर गावठाण क्षेत्राच्या हद्दीपासून 200 मीटरच्या परिघात येत नाही. असे असतानाही हा नियमबाह्य आदेश देण्यात आलेला आहे.

तसेच तहसीलदार संगमनेर यांनी आदेश देताना कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता राजकीय दबावाला बळी पडून आदेश दिलेला आहे. असा आरोप तक्रारी करण्यात आला आहे. सदरक्षेत्र तहसीलदार संगमनेर यांच्याकडील संदर्भीय आदेशान्वये बिगर शेती झालेले आहे. त्यानुसार बिगर शेती आदेशान्वये नोंदी गावी दप्तरी फेरफार नियमबाह्य पद्धतीने केले असून उतारेही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदारांनी बेकायदेशीररत्या फाळणी केली असून हे सर्व नियमबाह्य आहे त्यामुळे हे सर्व फेर रद्द करण्यात यावेत. तसेच बेकायदेशीर रित्या काम करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

