आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसात तक्रार !
संगमनेरची शांतता बिघडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण ?
राजकारण करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार…..
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याभोवती घडत असलेल्या अनेक संशयस्पद घटनांचा सत्य आणि वास्तुस्थितीदर्शक खुलासा होत नसल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात असतानाच चार दिवसांपूर्वी त्यांना मारहाण करणाऱ्या तरुणाच्या आईने आता आमदार खताळ आणि संदेश देशमुख यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेतील आरोपी प्रसाद गुंजाळ याची आई आणि अनिता गुंजाळ यांनी सर्व कागदपत्र समोर आणत थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याने या प्रकरणाचा राजकीय फायदा उचलणारे आणि संगमनेरची शांतता बिघडवणारे ‘झारीतले शुक्राचार्य’देखील उघडे पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलिसांनी खरेच सर्व बाजूंनी तपास करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत अनिता गुंजाळ यांनी म्हटले आहे की, मी, प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याची आई आहे. काल घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून. मी त्या घटनेचे समर्थन करत नाही. या घटनेचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. या घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही. काल झालेली घटना ही आर्थिक देवाण – घेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे.

माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी फसवलेले आहे. त्याच्याकडून सह्या केलेले कोरे चेक पुस्तक घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे मागील वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात होता. वारंवार घरी पोलीस गाड्या पाठवून, त्याला ब्लॅकमेल केले गेले, त्याच्यावर दबाव टाकला गेला. त्याने बऱ्याच वेळा आत्महत्येचाही विचार केला. आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. प्रसाद हा अमोल खताळ यांचा घरगुती मेंबर असल्यासारखा होता. अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे बरेच आर्थिक व्यवहार होते.

प्रसाद हा शेअर मार्केटमध्ये काम करायचा, त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्यासमोरच काही आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे. यातील बरेच व्यवहार रोखीने झालेले होते, तसेच त्याची नोटरीही झालेली आहे. सदर देवाण-घेवाण अमोल खताळ यांच्या कार्यालयातच झालेली आहे व ती रोख स्वरूपात झालेली आहे, हे सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी या तक्रारी सोबत ते जोडत आहे.

या सगळ्या संदर्भाने संगमनेर पोलीस स्टेशनमध्येच २०२४ मध्ये अमोलखताळ, तेव्हाचे पोलीस निरीक्षक मथुरे, माझे पती, मुलगा आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे त्यांची एकत्रित बैठकही झाली होती. पोलिसांना ते सर्व ठाऊक आहे. शेअर बाजारात मुलाला अपयश आल्यानंतर लोकांचे देणे देण्यासाठी मी त्याला त्याच्या वाट्याची जमीन दिली, ती त्यांनी विकली व त्यातून लोकांचे देणे दिले. पैसे त्याने चेकने बँकेच्या अकाउंट वरूनच परत केलेले आहे, तरीही बँकेत त्यांच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याला फसवले गेले. मागील काही दिवसांपासून त्याला सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या, त्याला ब्लॅकमेल केले जात होते, त्याच्यावर दबाव टाकला जात होता, तो प्रचंड मानसिक तणावात होता. याशिवाय माझा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून सारखा अमोल खताळ यांना भेटायचा आणि माझा विषय मिटवून द्या असे सांगायचा. शेवटी उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचललेले आहे. मी त्याचे कोणतेही समर्थन करणार नाही. मात्र त्याला या टोकापर्यंत पोहोचायला भाग पाडणाऱ्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही.

आज माझ्या कुटुंबाची प्रचंड बदनामी झालेली आहे, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या गावात, माझ्या माहेरी आम्हाला नावे ठेवली जात आहेत. जीवन संपवून टाकावे असे आम्हाला वाटत आहे. याशिवाय वेगवेगळ्या मार्गाने आमच्यावर दबावही निर्माण केला जात आहे. आज मी आणि माझे कुटुंब यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी अमोल खताळ, संदेश देशमुख आणि त्यांचे सहकारी कारणीभूत असतील. आमच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी, मुलाची फसवनुक केल्याप्रकरणी, आमच्यावर प्रचंड दबाव निर्माण केल्याप्रकरणी अमोल धोंडीबा खताळ, संदेश देशमुख यांच्यासह दोषी असणाऱ्यांना विरोधात मी तक्रार देत आहे.
