उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथील सभेत सावळा गोंधळ !
विखे पिता पुत्रांची गैरहजेरी खटकली…
संगमनेरच्या जनतेने सभेकडे पाठ फिरवली ; बाहेरच्या तालुक्यातून माणसे आणावी लागली — अमर कतारी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
गेल्या चार-पाच दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथे होणाऱ्या आभार सभेची चर्चा होती. सभा मोठी होईल यासाठी प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे दोघेही संगमनेरची सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे बोलले जात होते. मात्र आज वेगळे चित्र पाहण्यास मिळाले विखे पिता पुत्र यांनी ‘सभेला दांडी’ मारली. त्यांच्या गैरहजेरीची चर्चा होती. तर आमदार अमोल खताळ हे कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही असे सांगत असले तरी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की, बाचाबाची आणि सौम्य लाठी चार्ज झाल्याचे देखील समोर आले आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर एका तथाकथित कीर्तनकाराने टीका करून नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारून धडा शिकवण्याची वल्गना केली होती त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. या धमकीमुळे महायुतीबाबत जनता आणि थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेआधी थोरात यांनी घेतलेल्या सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. विराट सभा आणि उपस्थित जनसमुदाय यांनी सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या सभेतून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांनी आक्रमकपणे भाषणे करून महायुतीची लक्तरे वेशीला टांगली होती. संगमनेरात चांगलाच गदारोळ झाला होता.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा चांगलीच गाजवली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसा प्रकार दिसून आला नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यापेक्षा विखे पिता-पुत्र सभेला गैरहजर राहिल्याबद्दलच अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. तथाकथित कीर्तनकार यांनी नथुराम गोडसेचे केलेले उदात्तीकरण आणि त्या निमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न आणि महायुतीवर झालेले टीका याबाबत कोणीही प्रत्युत्तर दिले नाही किंवा त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. यामुळे उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांची नथुराम प्रकरणाला मुकसंमती आहे काय असा सवाल आता सभे नंतर उपस्थित करण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री थोरात यांच्यावर थेट टीका टाळली. आमदार सत्यजित तांबे हे सत्ताधारी की विरोधी या बाबतही कोणतेच भाष्य सभेत करण्यात आले नाही.

मोठा गाजावाजा करून इव्हेंटबाजी करण्याच्या नादामध्ये मूळ प्रश्नांना बगल देण्यात आली. संगमनेरची संस्कृती बिघडवणाऱ्या तथाकथित शिंदे सेनेने सभेचा फक्त बटबटीत गाजा वाजा केला. धर्मवाद जातीभेद संगमनेरकरांना कधीही मान्य नाही. या आभार सभेमध्ये पैसे देऊन लोक आणावे लागले ही मोठी शोकांतिका ठरली असून संगमनेर तालुक्यातील जनतेने सभेकडे पाठ फिरवली.
अमर कातारी, माजी संगमनेर शहर प्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
