आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरण —
आरोपी आणि आमदार खताळ यांचे कुठलेही आर्थिक हितसंबंध किंवा देवाणघेवाण नाही…
संगमनेर शहर पोलिसांचा स्पष्ट खुलासा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या करणारा आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ आणि आमदार खताळ यांच्यात कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक हितसंबंध अथवा देवाणघेवाण नसल्याचे संगमनेर शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सवा सारख्या संवेदनशील काळात मालपाणी लॉन्स येथे आमदार खताळ यांच्यावर हल्ला करीत आरोपी गुंजाळ यांनी त्यांना मारहाण करून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता तशा आशयाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सध्या तुरुंगात आहे. असे असताना सोशल मीडिया वरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने आणि विशेषतः आमदार अमोल खताळ आणि आरोपीचे आर्थिक हितसंबंध व देवाण-घेवाण असल्याचे आरोप प्रत्यारोप झाल्याने पोलिसांनी थेट आमदार खताळ यांचा या प्रकरणाशी कुठल्याही संबंध नसल्याचे स्पष्टपणे कळविले आहे.

दरम्यान आमदार खताळ यांच्यावर अजूनही हल्ल्या प्रकरणाबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. संगमनेर तालुक्यात यामुळे खळबळ उडालेली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमका गोंधळ निर्माण झालेला असून सर्व सत्य आणि वस्तुस्थिती तपासात स्पष्ट होईल असेही सांगण्यात आले आहे.

सोशल मीडिया मधून बदनामीकारक गोष्ट व्हायरल करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असून तपास चालू असताना त्यात अडथळा होईल असे कृत्य करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
