विरोधकांनी संगमनेरचे राजकारण खालच्या पातळीवर नेले — आमदार अमोल खताळ
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 13
संगमनेर मधील विरोधकांनी राजकारणाची अगदी खालची पातळी गाठत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून ज्या प्रमाणे मला विजयी केले त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे असेही ते म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील सांगवी येथील रस्ते कामाचा व धांदरफळ खुर्द येथील नागेश्वर मंदिर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धांदरफळ गटाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार खताळ म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकी मध्ये जसे गनिमी काव्याने या तालुक्यात गेली ४० वर्षाची प्रस्थापितांची सत्ता उलथावून टाकत परिवर्तन केले तसेच परिवर्तन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सुद्धा करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून आतापासूनच कामाला लागावे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाच्या रचना बदलल्या असल्या तरी कार्यकर्ते तेच आहेत. विधानसभेची निवडणूक नेत्यांची होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सर्वांनी विधानसभेसाठी तन-मन-धनाने काम केले तसेच काम पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत करायचेेे आहे.

संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारी यांसारख्या मोठ्या कामांना महायुती सरकारने गती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणली आहे.
विरोधकांनी खोट्या गुन्ह्यांत लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राजकारण खालच्या पातळीवर गेले असून, विरोधकांना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे अशी टीका आमदार खताळ यांनी केली.
आगामी निवडणुकी मध्ये उमेदवार कोण असेल हे पालकमंत्री विखे पाटील आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करून ठरवले जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी करावी. ग्राम पंचायतींमध्ये असलेल्या अडचणींवर डिसेंबरमध्ये लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
