भैरवनाथ गडावर भविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील राजुर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या आधी येणाऱ्या रविवारी यात्रा भरते. यंदा ही यात्रा रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.

भैरवनाथ गड शिरपुंजे पायथ्या पासून साधारण चौदाशे मीटर उंच डोंगरावर आहे. येथेच वाट नावाचा विधी केला जातो. वाट म्हणजे ज्या महिलांना मूलबाळ होत नाही त्या महिला पायथ्यापासून डोक्यावरील केसाने गडावर जाणारा रस्ता झाडीत गडावर जातात. अशी प्रथा आहे. यालाच वाट असे म्हणतात असे जाणकार ग्रामस्त सांगतात.

रविवारी 45 महिलांनी यात सहभाग घेतला होता. यात्रेसाठी 20 ते 25 हजार भाविकांनी हजेरी लावली. भैरवनाथाच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडाली होती. गडावर जाणाऱ्या मार्गात जागो जागी वन्यजीव विभागाने लोखंडी कठाडे तसेच जिने (शिड्या) लावल्याने भाविकांना गडावर जाण्यासाठी त्रास कमी झाला.

शिरपुंजे भैरवनाथ आदिवासी समाजाचे दैवत असल्यामुळे येथील आदिवासी समाज नवीन पिकवलेल्या भात पिकाचा नैवेद्य भैरवनाथाला अर्पण करण्यासाठी गडावर घेवून जात असतात. दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते.

वन परिक्षेत्राधिकारी प्रतिभा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 गार्ड व 50 स्थानिक मुलांच्या मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने स पो. नि.दीपक सरोदे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे, कोकणे , तांबे यांनी सुरक्षेच्या आणि शांततेच्या दृष्टीने यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

