भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात संतापाची ला
राज्यातील प्रमुख नेत्यांनी नोंदवला निषेध
प्रतिनिधी —
बेताल व भडक वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्या विरोधात अत्यंत गलिच्छ शब्दात टीका केल्याने संतापाची लाट निर्माण झाली असून महायुतीला फटका बसेल असे वक्तव्य करू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयातून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात आले असून त्या प्रसिद्धीपत्रकात वरील माहिती दिली आहे. तसेच त्यात म्हटले आहे की,

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत व अभ्यासू नेते असून सर्व पक्षांमध्ये त्यांचा आदर आहे सामाजिक जीवनात 40 वर्षे काम करताना त्यांनी विरोधकांचाही सन्मान केला आहे. मात्र व्यक्ति द्वेष मनात ठेवून सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यामध्ये विविध सभांमधून त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. भडक भाषणांमुळे वसंत देशमुख यांनी महिलांवर अत्यंत वाईट टीका केली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महायुतीच्या खरा चेहरा समोर आला आहे. भाजपकडून दंगली घडवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या नसून अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे यांना चांगलेच सुनावले महायुतीमध्ये वाद होईल असे चुकीचे वक्तव टाळा असे सांगून या घटनेचा निषेध केला. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही झालेली घटना दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी काळजी घ्यावी असे सांगितले. तर रूपाली चाकणकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून महिला आयोगाच्या वतीने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्राची मान खाली घालणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर यांनी सुजय विखे व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेताल वक्तव्य करून राज्यांमध्ये महिला भगिनी असुरक्षित केल्या असल्याची टीका केली आहे. याचबरोबर खासदार अमोल कोल्हे, सचिन खरात मंत्री उदय सामंत, नरहरी झिरवळ यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना या घटनेचा निषेध केला आहे.

सुजय विखे यांनी घाणेरडी पातळी गाठली — आमदार सत्यजित तांबे
लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु नीतीमूल्य जपली पाहिजेत. सुजय विखे यांनी मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात सभांमधून भडक वक्तव्य करून घाणेरडी पातळी गाठली आहे. तालुक्यातील एक वृद्ध कायम बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करत असून अशा लोकांना सोबत घेऊन ते प्रचारात फिरत आहेत. त्यांच्या या पद्धतीचा मी तीव्र निषेध करून अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून मी लवकरच याबाबत सर्व बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

