महिलांचा अवमान करणारे वसंत देशमुख पुन्हा अडचणीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील टीका महागात पडणार !
प्रतिनिधी —
माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविरुद्ध अभद्र वक्तव्य करून कायदा, शांतता मोडीत काढल्याबद्दल आणि महिलांचा अवमान केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेले वसंत देशमुख हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करण्यात आली आहे.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर येथील शिवसैनिक पंकज पडवळ यांनी यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विषयी खोटे आरोप करून त्यांची बदनामी केल्याबद्दल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आलेली आहे.

संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या बद्दल अतिशय अवमानजनक वक्तव्य करून आधीच अडचणीत आलेले आणि गुन्ह्यात अडकलेले वसंत देशमुख पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संगमनेरचे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालेले असल्याचे दिसून येत आहे.

पंकज पडवळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ या ठिकाणी पार पडलेल्या सभेत वसंत देशमुख यांनी भाषण करताना संगमनेर मधील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातले उमेदवार पैसे घेऊन दिले जात असल्याचे भर सभेत सांगितले. तसेच माझी मुंबईत राऊत यांच्याशी भेट होऊन मी त्यांना तोंडावर तसे म्हटलं असल्याचे देखील त्यांनी सभेत सांगितले. वास्तविक पाहता असे कुठलेही पुरावे वसंत देशमुख यांच्याकडे नाहीत. विनाकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांची बदनामी करण्याचा हा कट आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पडवळ यांनी केली आहे.

आधीच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्यावरील टीकाटिप्पणीमुळे अडचणीत आल्यानंतर आणि संगमनेर मध्ये त्यामुळे कायदा शांतता संस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता शिवसैनिकाने थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याच्या संदर्भातून तक्रार केल्याने शिवसैनिकांमधून याची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


