शिवसेना शिंदे गटाला संगमनेरची जागा मिळण्याची शक्यता
आमदार बाळासाहेब थोरात मंगळवारी 29 ऑक्टो. रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
वंचित आणि मनसेचे उमेदवार जाहीर ; भाजपचे तळ्यात मळ्यात
प्रतिनिधी —
संगमनेर विधानसभा मतदार संघात राजकीय गोंधळ सुरू असतानाच विद्यमान आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपचे अद्यापही या मतदारसघात उमेदवारी करण्यावरून तळ्यात मळ्यात सुरू असल्याने संगमनेरची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता असून त्या दृष्टीने या गटाने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समजली आहे.

अनेक गडबडीनंतर हॉटसीट झालेल्या संगमनेर विधानसभे मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध कोण उमेदवार उभा राहतो हा आता औत्सुक्याचा विषय झाला असून विखे विरुद्ध थोरात अशी लढत होती की नेहमीप्रमाणे समोर दुसरा उमेदवार येतोय हे मंगळवारी दुपार नंतर स्पष्ट होईल.

आमदार बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वेळेस ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आता 9 व्यांदा विधानसभेचा अर्ज भरणार आहे. सर्वांना सोबत घेऊन सहकार, समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करून हा तालुका राज्यासाठी आदर्शवत मॉडेल बनवला आहे. असे त्यांचे समर्थक नेहमीच सांगत असतात. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे अशी विविध महत्त्वाची खाती भूषवली आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला असून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळले आहे. सध्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असून राज्याच्या महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.

तालुक्यातील प्रचाराची जबाबदारी युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सांभाळत आहेत. आमदार थोरात हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 20 24 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी दाखल करणार असून यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रभावती घोगरे, यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.


