विखे पाटील समर्थकांकडून संगमनेर तालुक्याच्या अस्मितेवर घाला !
वाचाळवीरांमुळे विखे पाटील घराण्याची नैतिकता चर्चेत
आमदार थोरात यांच्या मुलींबाबत अभद्र वक्तव्य..
प्रतिनिधी —
संगमनेर विधानसभा मतदार संघात पारंपारिक विरोधक विखे पाटील घराणे आणि थोरात घराणे यांच्या राजकारणाने हिंसक वळण घेत नैतिकतेला तिलांजली देण्याची पातळी गाठली आहे. त्यातच विखे पाटील घराण्याशी संबंधित अडगळीत पडलेल्या गाव पुढाऱ्यांनी जाहीर भाषणांमधून थोरात यांच्या परिवारातील महिलांचा आणि विशेषतः त्यांच्या मुलींचा अपमान करण्याचा जो अभद्र प्रकार केला त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यात उमटू लागले आहेत. या वाचाळवीरांमुळे विखे पाटील घराण्याला नैतिकता राहिली आहे की नाही ? याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

विखे पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. त्या सर्व घडामोडींमुळे आमदार थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान आता हे निवडणुकीचे राजकारण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून वसंतराव देशमुख आणि माजी खासदार डॉक्टर सुधीर विखे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज सकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात महिला व कार्यकर्त्यांना निषेध करण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल याबाबत काळजी व्यक्त होत आहे.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात संवाद सभांचा धडाका लावला. मात्र या सभांमधून राजकीय भाषणे होण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीवरच्या टीका होऊ लागल्या. थोरात समर्थकांकडून आणि विशेषत. डॉक्टर जयश्री थोरात यांच्याकडूनही त्यास उत्तर देण्यात आले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातले वातावरण तापू लागले होते. सुसंस्कृत राजकारणासाठी संगमनेर तालुका हा सुपरिचित आहे. या ठिकाणी येऊन संगमनेरची शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम विखे समर्थक आणि डॉक्टर सुजय विखे हे करीत असल्याचा आरोप होत आहेत.

