वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण !
शहर पोलिसांची दादागिरी ; प्रांत अधिकारी कार्यालयाने वरिष्ठांना कळवले
प्रतिनिधी —
अनेक वर्षांपासून वापरात असलेला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता दादागिरीने बंद करून कुटुंबाला रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्यां वरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि तहसीलदार यांनी हा रस्ता वहिवाटिस मोकळा करून द्यावा असा आदेश दिलेला असतानाही कुठलीही दखल न घेणाऱ्या संगमनेरच्या प्रशासनाच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील संपूर्ण कुटुंबाने आपल्या अडीच वर्षाच्या बालकासह गेल्या तीन ते चार दिवसापासून प्रांत कार्यालय समोर उपोषण सुरू केलेले आहे. ऊन वारा पावसात हे उपोषण चालू असून प्रांत कार्यालयाकडून या संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविली आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील मच्छिंद्र गोविंद वाकचौरे (वय 60), हौसाबाई मच्छिंद्र वाकचौरे (वय 50) साईनाथ मच्छिंद्र वाकचौरे हे आपल्या मयंक साईनाथ वाकचौरे (वय वर्ष अडीच) या बालकासह उपोषणास बसले आहेत. त्यांचा प्रश्न सोडविण्या ऐवजी किंवा त्यातून मार्ग काढणे ऐवजी संगमनेर शहर पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून आचारसंहितेचा भंग करत असून उपोषण आंदोलन बंद करावे आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन करावे असा नोटीसीद्वारे दम दिला आहे.

वाकचौरे यांचे वडगाव लांडगा येथे घर आहे. या घरात कडे जाण्यासाठी गावातून आलेला पूर्वापार रस्ता आहे. हा रस्ता ज्यांच्या शेतातून जातो ते अभिराज सुभाष मालुंजकर, सोपान श्रीरंग लांडगे, संगीता अशोक मालुंजकर (सर्व राहणार वडगाव लांडगा, तालुका संगमनेर) यांनी हा रस्ता बंद केला असून या रस्त्याने येण्या जाण्यास वाकचौरे यांना मज्जाव केला आहे. त्या विरोधात वाकचौरे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. संगमनेरच्या तहसीलदारांनी याबाबत निकाल देऊन त्यात म्हटले होते की, वडगाव लांडगा येथील अर्जदार वाकचौरे यांचा गट क्रमांक 1058 मध्ये येण्या जाण्यासाठी गट क्रमांक 1055 आणि 1056 मधून असणारा पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यात निर्माण केलेला अडथळा त्वरित दूर करून रस्ता पूर्ववत खुला करून द्यावा आणि भविष्यात कुठलाही अडथळा वाकचौरे यांना करण्यात येऊ नये असा आदेश दिला होता. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसून हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. म्हणून न्याय मिळवण्यासाठी वाकचौरे कुटुंबियांनी प्रांत कार्यालयात समोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून हे उपोषण चालू असून कुठलेही डोक्यावर छत नसल्याने मुसळधार पावसात देखील उपोषणाला बसावे लागत आहे.

शहर पोलिसांची दादागिरी
उपोषणकर्ते वाकचौरे यांच्या कुटुंबियांना शहर पोलिसांनी नोटीस दिली असून त्यात म्हटले आहे की, सध्या आचारसंहिता सुरू आहे. आपल्याला कुठलेही आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावे व आचारसंहितेचा भंग करू नये. अशी नोटीस बजावली असून संविधानिक मार्गाने आंदोलन करावे असे बजावले आहे. मुळात उपोषण हाच सर्वात मोठा संविधानिक मार्ग असून पोलिसांना अजून कोणता संविधानिक मार्ग हवा आहे असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान या संदर्भात तहसीलदारांच्या निकाला विरोधात मालुंजकर यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. मात्र प्रांत अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवत सदर केस मला दुसऱ्या कोर्टात चालवायची आहे असे म्हणत हरकत घेतली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी आणि याप्रकरणी निकाल देण्याचे अधिकार आता दुसरीकडे असल्याने कायदेशीर बाबीतील अडचणींमुळे हे प्रकरण अडचणीत सापडले असल्याची माहिती समजली आहे.
