संगमनेर शहरातील रस्ते खराब…खड्डे बुजवण्याची काँग्रेसची मागणी !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातले रस्ते खराब झाले असून त्यावर खड्डे पडले आहेत. सणासुदीच्या काळात हे रस्ते दुरुस्त करून खड्डे बुजवावेत. तसेच नगरपालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, पार्किंग व्यवस्था याबाबतच्या सर्व अडचणी आणि पालिकेच्या व्यवस्थापनाकडून होणारी जनतेची अडवणूक याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

संगमनेर शहर ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवाळी सणाच्या निमित्ताने संगमनेर शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. आलेल्या सर्वांना पार्किंगची चांगली व्यवस्था व्हावी त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन व्हावे, विविध रस्त्यांवरती असलेले खड्डे बुजवावेत आणि शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात या मागणी करता संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, शैलेश कलंत्री, किशोर पवार, बाळासाहेब पवार, नूर मोहम्मद शेख, इसाहकखान पठाण, संतोष मुर्तडक, धनंजय डाके, अनुज अरगडे, राजेंद्र वाकचौरे, आसिफ खान, सुभाष दिघे, अंबादास आडेप , गणेश मादास आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत असल्याने दिवाळीच्या काळात शहरांमध्ये कोटींची उलाढाल होत असते. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने संगमनेर शहरात येतात. त्यामुळे या सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, सणासुदीच्या काळातील स्वच्छते करता घनकचरा व्यवस्थापन व्हावे, सर्व रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात, विविध रस्त्यांवर असले खड्डे तात्काळ बुजवावेत, तसेच आलेल्या सर्व नागरिकांना पार्किंगची चांगली सुविधा व्हावी.

आंदोलनाचा इशारा...

माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक म्हणाले की, मागील अडीच वर्ष प्रशासनाने अनेक कामे रखडवली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अनेक खड्डे पडले असून याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तरी तातडीने सर्व खड्डे बुजवावेत अशी आग्रही मागणी केली. अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!