रोटरीचे अखंडीत कार्य समाजासाठी प्रेरणादायी — आमदार बाळासाहेब थोरात
साईनाथ साबळे यांची अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी —
संगमनेर रोटरी क्लबने आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजविले आहे. रोटरीचे प्रकल्प हे कायमस्वरुपीचे प्रकल्प असतात आणि ते समाजासाठी प्रेरणादायी असतात, रोटरी आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून रोटरी क्लबने केलेले सामाजिक कार्य हे देवत्वाची प्रचिती देणारे आहे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
मालपाणी लॉन्स येथे झालेल्या पदग्रहण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे मावळते अध्यक्ष आनंद हासे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे साईनाथ साबळे यांच्याकडे तर मावळते सचिव मधुसूदन करवा यांनी सचिवपदाची सूत्रे विश्वनाथ मालाणी यांचेकडे सुपूर्त केली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे, सहाय्यक प्रांतपाल विनोद पाटणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात आदि उपस्थित होते.

याप्रसंगी संगमनेर तालुक्यात प्रतिष्ठीत समजला जाणारा रोटरी सेवा गौरव पुरस्कार गेली ५० हून अधिक वर्षांपासून रुग्णांची सेवा करणारे डॉ. अशोक पोफळे यांना प्रदान करण्यात आला.
माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे म्हणाले की, रोटरी क्लबचे कार्य आहे दैवी आनंद देणारे आहे. आजही देशातील २७ टक्के नागरिक उपाशी झोपत आहेत त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करावे, रोटरी क्लबच्या माध्यमातून सदस्यांनी बिगर, बेटर आणि बोल्डर असे कार्य करावे ते समाजासाठी हितावह आहे. आपण समाजासाठी दायित्व लागतो या भावनेतुन सर्व सभासदांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदिंची भाषणे झाली. त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

क्लबचे नवनिर्वाचीत अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी त्यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास मांडणारी चित्रफीत सादर केली. तसेच येत्या वर्षात करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती आपल्या भाषणातून दिली. मावळते अध्यक्ष आनंद हासे यांनी वर्षभर केलेल्या कामाची चित्रफीत सादर केली. तसेच सर्व डायरेक्टर्सचा मानचिन्ह देऊन सन्मान केला.

रोटरी आय केअरचे सचिव संजय लाहोटी यांनी आतापर्यंत केलेल्या प्रकल्पांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास करंजेकर, डॉ. रमेश पावसे, अजित काकडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी विश्वनाथ मालाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार विकास लावरे, दिलीप मालपाणी, सीए संजय राठी, दिपक मणियार, सुनिल कडलग, डॉ. विनायक नागरे, सुदीप वाकळे, मोहित मंडलिक, महेश ढोले, मनमोहन वर्मा व सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.
