गिर्यारोहक श्रीकांत कासट यांना ‘गिरीमित्र’ पुरस्कार !

प्रतिनिधी —

अडचणींच्या चार भिंती ओलांडून डोंगरदर्‍या, गडकोट, नद्या आणि जंगलांमध्ये स्वच्छंद पायपीट करणार्‍या गिर्यारोहकांचे 21 वे ‘गिरीमित्र संमेलन’ मुंबईतील मुलुंड येथे पार पडले. जागतिक कीर्तिचे गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलेकी व इतिहास तज्ञ प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात संगमनेरचे दुर्गमित्र श्रीकांत कासट यांच्या या क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना ‘गिरीमित्र’ पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी अष्टहजारी चौदा शिखरे सर केली असे अल्पाईन पद्धतीच्या आरोहाणातील अग्रणी, एकलं आणि वेगळ्या मार्गाने आरोहणाचा हातखंडा, प्रतिकुल वातावरणातही हिवाळी एव्हरेस्ट मोहीम, कांचन जुंगा व ल्होसे शिखरं सर करणारे पहिले गिर्यारोहक, पोलंडचे ज्येष्ठ गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलेकी या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून तर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते गिर्यारोहणाच्या प्रचार-पसारासह गडकोटांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रदीर्घ परिश्रम घेणार्‍या संगमनेरच्या दुर्गमित्र श्रीकांत कासट यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

दुर्गमित्र श्रीकांत कासट यांनी गेल्या पाच दशकांत सह्याद्री, आरवली, सातपुडा आणि हिमालयात भटकंती करताना जवळपास 500 किल्ले सर केले आहेत. या कालावधीत त्यांनी गीता परिवाराच्या गिरीभ्रमण मोहीमांच्या माध्यमातून हजारों विद्यार्थ्यांना गडकोट भटकंतीचा लळाही लावला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी वर्षभरात पन्नास आणि साठाव्या वर्षी वर्षभरात साठ किल्ल्यांची चढाई करणारे कासट म्हणजे खर्‍याअर्थी दुर्गयोगीच.

आपल्या प्रदीर्घ दुर्गमोहीमांमधून कासट यांनी छायाचित्रणाचाही छंद जोपासला असून त्यांनी टीपलेली हजारों छायाचित्र पाहताना अक्षरशः भान हरपून जाते. गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्या संकल्पनेतून त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य शाळा-महाविद्यालयात या छायाचित्रांचे प्रदर्शनही घडवले आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसादही मिळाला आहे. आपल्या प्रत्येक गिरीभ्रमण मोहीमेतून ते सोबत्यांना साधेपणा, कमीतकमी गरजांमध्ये राहण्याची वृत्ती, स्वावलंबन, निसर्गाशी एकरुपता, नेटके नियोजन, समयपालनता, इतिहास व भूगोलाचे ज्ञान, नकाशा वाचन, वस्पती आणि वन्यजीव सृष्टीची माहिती, सहस, निडरता, देशभक्ती, चौकस वृत्ती आणि पराक्रमाचे धडे देत असतात. एकदा त्यांच्या सोबत डोंगरयात्रेला गेलेली व्यक्ति त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय रहात नाही असे त्यांचे जीवन आहे.

लोकप्रिय असलेल्या ‘दुर्ग’ या दिवाळी अंकाचे ते मानद संपादक असून नुकतेच त्यांनी आजवर काढलेल्या छायाचित्रातील निवडक 45 गडकोटांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले ‘दुर्गवैभव महाराष्ट्रा’चे हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील छायाचित्रे आणि नेमकी माहिती नव गिर्यारोहकांसाठी वाट दाखवणारी ठरेल. डॉ.शिवरत्न शेटे यांच्या हिंदवी संघटनेकडून दरवर्षी महाराष्ट्रात राबविल्या जाणार्‍या दुर्गमोहीमेचे ते प्रमुख असतात. याशिवाय राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या समिती सदस्यपदीही ते कार्यरत आहेत. दुर्गभटकंती विषयात भीष्म ठरलेल्या श्रीकांत कासट यांना ‘दुर्गमित्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्यासह गिरीभ्रमण क्षेत्रातील विविध संस्था, संघटना, पदाधिकारी व व्यक्तिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!