आता… कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी लागणार ओळखपत्र !
ग्रामसभेत करण्यात आला ठराव
प्रतिनिधी —
महाराष्ट्रातल्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि भाविकाला यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळखपत्र दाखवावे लागेल. या ओळखपत्राची तपासणी करून नोंदणी केल्यानंतरच कळसुबाई शिखरावर जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसा ठराव बारी आणि जहागीरदार वाडी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या संयुक्त ग्रामसभेने एकत्रितरित्या घेतला आहे.

कळसुबाई शिखर ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या बारी आणि जहागीरवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीची ग्रामसभा एकत्रितरीत्या नुकतीच पार पडली. त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती बारी च्या सरपंच वैशाली खाडे आणि जागीरदार वाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे यांनी संयुक्त रित्या दिली आहे.

महाराष्ट्रातल्या या सर्वोच्च शिखरावर वर्षभरात अनेक पर्यटक आणि भाविक येत असतात. नवरात्रोत्सव दसऱ्याच्या दरम्यान गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वर्षभरात पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची देखील गर्दी कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी झालेली असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर बाबींचे महत्त्व पाहता वरील निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच आता पावसाळा सुरू झाल्याने कळसुबाई शिखराचे सौंदर्य पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देश भरातून पर्यटक कळसुबाई शिखराला भेट देण्यासाठी येत असतात. त्यातच काही हौशी पर्यटक सुद्धा येत असतात. कळसुबाई ट्रेक करणे म्हणजे मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा आनंद, पक्षांचा चिवचिवाट, तसेच स्थानिकांनी राखून ठेवलेल्या झाडे झुडपे, डोंगरावरून वाहणारे असंख्य छोटे मोठे धबधबे, झरे पाहण्याचा मोठा आनंद मिळतो. परंतु काही अति उत्साही पर्यटक याचे भान ठेवताना दिसत नाहीत. त्या साठी कळसुबाई किंवा सह्याद्रीत कोठेही फिरताना एक नियमावली असावी त्या दृष्टीने ट्रेकला जात असताना जोरजोरात ओरडणे, स्पीकर वाजवणे, शिखरावर जाऊन नाच गाणे करणे, अनपेक्षित रील्स बनवणे, मद्यपान, धूम्रपान करणे, शिखरावर कचरा करणे. अश्या गोष्टींना आळा बसण्या साठी हे प्रयत्न सुरू आहेत.

आता कळसुबाई शिखरावर जाताना प्रत्येक पर्यटकाला आपले पूर्ण पत्ता असलेले आधार कार्ड किंवा पूर्ण पत्ता असलेले कोणतेही छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक पर्यटक व त्यांच्या गाडीची तपासणी केली जाणार आहे. प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात येणार आहे. सोबतच प्रवेश शुल्क म्हणून प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारणी गावातील समिती द्वारे केली जाणार आहे.

कळसुबाई शिखरावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटक व भाविक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळख पत्र तपासून व नोंदणी करून प्रवेश दिल्यास शिखरावर घडणाऱ्या वेगवेगळ्या अनुचित प्रकारांना आळा बसेल. दुर्दैवाने झालेल्या अपघाताच्या वेळी ओळख तपासण्याच्या कामी त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण काही वर्षांपूर्वी एका तरुण मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती तिची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नाही. तसेच नियम पालन करणाऱ्या पर्यटकांना यातून दिलासा भेटेल.
पंढरीनाथ खाडे, सरपंच – जहागीरदारवाडी
