महिला रोजगार व स्वयंरोजगारांसाठी भव्य इंदिरा महोत्सव !
डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना
प्रतिनिधी —
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी मिळावी याचबरोबर त्यांना व्यवसाय उद्योजकतेचे मार्गदर्शन व्हावे याकरता थोरात कारखाना कार्यस्थळावर 3 व 4 सप्टेंबर 2024 रोजी भव्य इंदिरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

इंदिरा महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना डॉ. थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांचा थेट उद्योजकांशी संवाद व्हावा या उद्देशाने दोन दिवसीय इंदिरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोजगार, प्रशिक्षण, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास यामधून महिलांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्यभरातील नामांकित कंपन्यांचे विविध स्टॉल सहभागी असून ते अनेक महिलांना कच्चामाल देऊन महिलांकडून उत्पादित पक्का माल खरेदी करणार आहेत. तसेच कर्ज प्रकरण कसे करावे याबाबत बँकांमधील तज्ञ ही मार्गदर्शन करणार आहेत. मालाचे मार्केटिंग, एक्सपोर्ट कसे करावे याबाबतही मार्गदर्शन होणार असून सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. यांसह राज्यभरात बचत गटातून यशस्वी काम करणाऱ्या तज्ञ महिलांचे मार्गदर्शन होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांसह संगमनेरातील सर्व मान्यवर व राज्य पातळीवरील महिला नेत्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याच्या परिसरातील अमृतेश्वर मंदिरा समोरील मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये कापसे पैठणी, सह्याद्री ऍग्रो, प्रतीक्षा ट्रॅडिशनल बॅग, विजया ऍग्रो, टू ब्रदर्स गोदावरी फार्म, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बारामती बायोगॅस, सेजल ग्रुप, मिल्क फूड इंजिनिअरिंग, सेल्को फाउंडेशन आदींसह राज्यभरातील नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. याच बरोबर कापसे पैठणी तर्फे भाग्यवान महिलांना पैठण्या भेट दिल्या जाणार आहेत. तरी या इंदिरा महोत्सवात जास्तीत जास्त महिला तरुणी बचत गटातील महिला या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. जयश्री थोरात व दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
