बालविवाह लावणाऱ्या पुरोहितासह पाच जणांवर गुन्हा दाखल 

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील खळी या गावात एका पंधरा वर्षीय बालिकेचा विवाह लावणाऱ्या पुरोहितासह मुलगी आणि मुलाकडच्या पाच जणांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नवरदेवासह मुलगी आणि मुलाच्या आई-वडिलांचा समावेश आहे.

कल्पना गणेश नागरे, गणेश सखाराम नागरे (राहणार पानोडी, तालुका संगमनेर) अरविंद दत्तू घुगे, मंदा दत्तू घुगे, दत्तू सुखदेव घुगे (सर्व राहणार खळी, तालुका संगमनेर) आणि पांडुरंग भानुदास दिमोटे (पुरोहित) (राहणार निंभेरे, तालुका राहुरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यातील खळी या गावात हा बालविवाह दिनांक 10 मे 2024 रोजी गुपचूप पणे उरकण्यात आला होता. याची खबर त्या बालिकेच्या नातेवाईकाला लागताच त्याने या घटनेची माहिती खळी येथील ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांच्याकडे दिली आणि त्यांना लग्नाचे फोटो व इतर पुरावे सादर केले.

त्यानंतर खळी गावातील बालविवाह समिती सदस्य मच्छिंद्र पाराजी चकोर, पोलीस पाटील) राधिका दिगंबर घुगे, अंगणवाडी सेविका) विलास गजानन वाघमारे, सरपंच) राजेंद्र नामदेव चकोर, उपसरपंच) कल्पना रवींद्र अंधोरे (बालविकास प्रकल्प प्रभारी अधिकारी संगमनेर) यांनी या सर्व प्रकरणाची खात्री करून घेतली असता, मुलीचे आई-वडील व मुलाच्या आई-वडिलांनी आम्ही साखरपुडा केला आहे लग्न नंतर करणार आहोत असे सांगितले. तसेच या विवाहासाठी पुरोहित म्हणून काम पाहिलेल्या ब्राह्मणाने देखील हा फक्त साखरपुडा आहे. लग्न केलेले नाही. असे सांगितले. परंतु उपलब्ध पुरावे, फोटो आणि इतर कागदपत्रानुसार ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्याने सर्व आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!