पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले त्या आईलाच विसरण्यासारखे आहे !
आमदार थोरात यांचा नामदार विखेंना टोला !!
संगमनेर तालुक्यात खबऱ्यांचा सुळसुळाट…
प्रतिनिधी —
अनेक लोक पक्ष बदलतात, पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले, लहानचे मोठे केले. त्या आईलाच विसरण्यासारखे आहे. असा टोला पालकमंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला असून भोजापुर पूर चारीच्या कामात ज्यांचे काही योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही, ते लोक या परिसरात येऊन मनभेद निर्माण करत आहेत. अशांना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तिगाव वटमादेवी येथे भोजपूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख निधी मधून १६ किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समवेत डॉ सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, केशरबाई सानप, भाऊसाहेब गीते, रमेश सानप, सरपंच सुदाम गीते, जलसंधारण विभागाचे अभियंता सुरेश मंडलिक आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, तळेगाव भागातील गावांना पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर पूरचारी करण्यात झाली. दरवर्षी या चारीसाठी कारखान्याच्या वतीने काम केले जात असल्याने काही गावांना पाणी मिळते. या चारीच्या कामात ज्यांचे काही योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही. ते लोक या परिसरात येऊन मनभेद निर्माण करत आहेत. अशांना थारा देऊ नका. आता नव्याने सोनेवाडी ते तिगाव माथा हे दुरुस्तीचे काम सुरू होणार असून येणाऱ्या काळात पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम केले जात आहे.

कारखान्याच्या वतीने भोजापुर चारी करण्यात आली. आपण जलसंधारण मंत्री असताना ही चारी त्या खात्याकडे वर्ग केली. दरवर्षी कारखान्याच्या मदतीतून पाणी आणण्यासाठी काम केले जात आहे. ज्या लोकांचे कोणतेही योगदान नाही. त्यांचा हेतू चांगला नाही अशी लोक या भागांमध्ये येऊन मनभेद निर्माण करत आहेत. त्यांचा उद्देश ओळखा. त्यांनीही ३५ वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी काय काम केले हा मोठा प्रश्न आहे.

सत्ता आल्याने ते अडवणूक करत आहेत. खोट्या केसेस करून तालुक्यात दडपशाही निर्माण करू पाहत आहेत. काही खबरे काम करत आहेत. त्यांना थारा देऊ नका. संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी ७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला. या सरकारने त्याला स्टे लावला. सुप्रीम कोर्टातून स्टे उठवला. आता चिंचोली ते मालदाड रस्त्याचे कामही सुरू आहे. सध्याचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी होत असल्याचेही ते म्हणाले.

अनेक लोक पक्ष बदलतात पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले लहानचे मोठे केले त्या आईला विसरण्यासारखे आहे. लोकशाही धोक्यात आली आहे, ईडीसीबीआयचा धाक दाखवला जात आहे. खोके सरकार, त्यामध्ये असलेली दुफळी आता उघड झाली आहे. धार्मिकतेच्या नावावर राजकारण केले जात आहे. विकासाचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. मणिपूर मध्ये महिलांवर अत्याचार झाला राष्ट्रीय कुस्तीगीर महिलापटूवर अत्याचार झाला. त्यावेळेस सरकार गप्प होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची घेणेदेणे नाही. दिल्लीच्या वेशीवर आलेल्या शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले, त्यांच्यावर अश्रूधूराचा मारा केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असेही थोरात म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सानप यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर शंकर ढमक यांनी आभार मानले.

