संगमनेर तालुक्यात निष्ठावान भाजप कार्यकर्ते आणि ‘नव्याने आलेले’ यांच्यातील धुसफुस शिगेला !
BJP विरुद्ध VJP संघर्षाची चर्चा !!
जिल्हाध्यक्ष लंघेंवर स्वतःचेच आदेश मागे घेण्याची नामुष्की…
प्रतिनिधी —
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या पासून भाजपा अंतर्गत सुरू असलेली धुसफूस वाढत जाणार आणि त्यातून नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा वाद निर्माण होणार असे राजकीय भाकीत वारंवार नगर जिल्ह्यात सांगितले जात होते. त्याचे परिणाम संगमनेर तालुक्यातून दिसू लागले आहेत. पदाधिकारी निवडण्याच्या वादावादीतून जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना संगमनेर अध्यक्षांसह संगमनेर तालुका मंडळ कार्यकारणी रद्द केल्याचा दिलेला आदेश पुन्हा अगदी २४ तासात मागे घ्यावा लागला. ही नामुष्की त्यांच्यावर एका बड्या नेत्याचे ऐकल्यामुळे ओढवली असल्याची चर्चा असून नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद उफाळला आहे.

संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी दोन-तीन महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. परंतु नव्याने आलेल्या भाजपमधील काही कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढल्याने नको त्या गोष्टी रंगवल्या गेल्या. जिल्ह्यातील नेत्यांच्या कानात जे नाही ते बोलले गेले आणि अखेर नेत्यांनी डोळे व कान यातील अंतर न पाहता अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून जिल्हा अध्यक्षांवर दबाव टाकून संगमनेर तालुका अध्यक्षासह कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यास भाग पाडले. मात्र जिल्हा अध्यक्षांच्या त्या आदेशाची प्रदेश कार्यालयाने गंभीर दखल घेतल्याने व स्थगिती मिळाल्याने दिलेला आदेश त्यांना परत मागे घेण्याची नामुष्की ओढावली असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आहेत.

दिनांक ६ मार्च रोजी नगर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष विठ्ठलराव वकीलराव लंघे यांनी संगमनेर तालुका भाजप अध्यक्ष वैभव रामचंद्र लांडगे यांना पत्र देऊन त्यात म्हटले होते की, संगमनेर तालुका अध्यक्ष पदासह संगमनेर तालुका मंडळ कार्यकारणी रद्द करीत आहे. या आदेशानंतर निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र सर्व प्रकार राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर आणि वस्तुस्थिती त्यांना समजल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीने त्यात लक्ष घातल्याने जिल्हाध्यक्ष लंगे यांना पुन्हा २४ तासात दुसरे पत्र तालुका अध्यक्ष लांडगे पाठवले असून बरखास्त करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे कळविले आहे.

दिनांक ७ मार्च रोजी लांडगे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुका अध्यक्ष पदासह संगमनेर तालुका मंडळ कार्यकारी बरखास्त करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते व प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चेअंती सदर संगमनेर तालुका अध्यक्ष यांना सात दिवसात घडलेल्या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करावा असे सुचित करण्यात येत आहे. तसेच संगमनेर तालुका अध्यक्ष व संगमनेर तालुका मंडळ कार्यकारणी बरखास्त केलेल्या निर्णयाला मी पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती देत आहे.

या पत्रापत्री वरून संगमनेर तालुका भाजपा मधील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या पत्रांची चर्चा भाजपामध्ये जोरदारपणे रंगली असून जिल्हाध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या ‘त्या बड्या नेत्यावर चांगले तोंडसुख’ घेतले जात आहे.
