डॉक्टर सुजय विखे यांना लोकसभेचा पेपर अवघड जाणार !
विशेष प्रतिनिधी —
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना भाजप तर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. विखे हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र असे असतानाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विखेंच्या निवडणुकीविषयी उलट सुलट चर्चा सुरू असून या निवडणुकीच्या संदर्भाने विविध अंदाज मांडले जात आहेत. त्यामध्ये यंदाची ही निवडणूक डॉक्टर सुजय विखे यांना अवघड जाणार असून त्यांना निवडणुकीत संघर्ष करावा लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

स्वतःच्या निवडणुकीच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचे नगर जिल्ह्यात नेहमीच वर्चस्व राहिलेला आहे. निवडणुका आणि यश हे त्यांच्यासाठी नवीन नाही. कुठलीही निवडणूक असो त्यांना यश मिळत गेले आहे. विखे यांच्या घराण्यातील कोणीही व्यक्ती उभी असली तरी त्यांना अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. एखादा अपवाद वगळता विखे यांनी निवडणुकीच्या राजकारणात नेहमीच सरशी केलेली आहे.

विखे घराण्यात अगदी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून ते सुजय विखे पाटलांपर्यंत राजकारणासाठी पक्ष बदलणे हा नवीन प्रकार नाही. अनेक वेळा पक्ष बदलण्यात ते माहीर आहेत. मात्र निवडणुकीत यश मिळवण्यात ते अग्रेसर आहेत. डॉक्टर सुजय विखे हे दक्षिणेचे खासदार झाल्यानंतर त्यांच्या कामाचा आणि वक्तव्यांचा नेहमीच बोलवाला राहिलेला आहे. मात्र भाजप पक्षांतर्गत असणाऱ्या त्यांच्या छुप्या विरोधकांनी सुद्धा त्यांना नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळीही विखे यांना निवडणुकीत भाजप अंतर्गत कलहाचा सामना करावा लागू शकतो.

दक्षिणेतील कर्जत जामखेड, शेवगाव, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, अहमदनगर शहर या मतदारसंघांमधून विखेंना निवडून येण्यासाठी मते मिळवायची आहेत. गेल्या पाच वर्षातील देशातील राजकारण आणि जिल्ह्यातील राजकारण पाहता यंदाच्या वेळी विखेंना मोठी ताकद लावावी लागणार आहे. अर्थात विखेंची यंत्रणा ही निवडणूक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ यंत्रणा मानली जाते. मात्र जनतेच्या नाराजी पुढे कुठलीही यंत्रणा सर्वकाळ सर्वश्रेष्ठ ठरू शकत नाही. मतदार कोणत्याही यंत्रणेला पराभूत करू शकतो हेही तितकेच खरे.

यावेळेस डॉक्टर सुजय विखे यांची लढत कोणाविरुद्ध होणार हा देखील चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जर दक्षिणेत जास्त इंटरेस्ट घेतला तर विखेंना आणखीच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शेवगाव, कर्जत जामखेड, श्रीगोंदा, राहुरी या मतदारसंघात त्यांना अधिक बारकाईने लक्ष ठेवून मतदान मिळवावे लागणार आहे. फक्त पक्षातील अंतर्गत विरोधक त्यांचा घात करू नये हे महत्त्वाचे आहे. यावेळी आघाडीतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, मित्रपक्ष, वंचित बहुजन आघाडी, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील विखे पाटलांच्या राजकारणामुळे अनेक निवडणुकांपासून त्रस्त असलेली नेतेमंडळी त्यांच्या पराभवासाठी प्रयत्नशील असेल. राजकारणात एकमेकांचा बदला घेण्याचा फॅक्टर नेत्यांनी खरेच राबवला तर या फॅक्टरचा परिणाम विखे पाटलांच्या निवडणूक निकालावर होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे.

जिल्ह्यातील राजकारणात आणि वेगवेगळ्या मतदार संघात नेहमीच राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या विखे पाटील घराण्याविषयी त्या त्या क्षेत्रातील नेत्यांमध्ये नाराजी ठासून भरलेली आहे. अगदी नगरपालिकांच्या निवडणुकांपासून ते थेट खासदारकी पर्यंतच्या निवडणुका आणि सहकारात जिल्ह्या अंतर्गत होणाऱ्या निवडणुकांमध्ये विखे पाटील घराण्याचा होणारा हस्तक्षेप हा सर्व परिचित आहे. सध्या काही नेते त्यांच्या पक्षाच्या सोबत असले तरी ही खदखद छुप्या रीतीने जर त्यांच्या विरोधात वापरली गेली तर मात्र विखे पाटलांना लोकसभेचा हा पेपर अवघड जाणार आहे. प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच असेल असे नाही. शिवाय आता जुना काळ गेला आहे. नवे राजकीय पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे निष्ठा, मानपान या गोष्टींना कोणताही थारा राहिलेला नसून फक्त विजय मिळवणे आणि सत्ता काबीज करणे हाच एक उद्देश असल्याने कोण कोणाचा काटा काढील हे सांगता येत नाही.

