काही लोक संगमनेर तालुक्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत — आमदार थोरात
भाजपचे ॲड.रामदास शेजुळ यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी —
आजकाल अनेक ठिकाणी स्वार्थी राजकारण चालू असते. संगमनेर मध्ये मात्र सन्मानाचे राजकारण असते. तालुक्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम अनेक लोक करत आहेत. अशांतता निर्माण करत आहेत. परंतु आता जनतेने त्यांना ओळखले आहे. विकासाची व चांगल्या कामाची तालुक्याची ओळख असल्याने हीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायचे असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड.रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी आमदार थोरात बोलत होते.

कारखाना कार्यस्थळावरील शॅम्प्रो येथे ओझर परिसरासह त्यांच्या अनेक समर्थकांनी आमदार थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, शंकर खेमनर, मीरा शेटे, ॲड.लक्ष्मण खेमनर, संतोष हासे, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ॲड.रामदास शेजुळ यांच्यासह भाऊसाहेब शेजुळ, राजेंद्र शेजुळ, दिलीप शेपाळ, बाळासाहेब शिंदे, दादा पाटील शेजुळ, नामदेव थोरात, गंगाधर शेजुळ यांसह त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आमदार थोरात म्हणाले की, चांगल्या कामामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात आणि देशात सन्मान झाला आहे. तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली. यामध्ये तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांची अत्यंत चांगली फळी आहे. सर्व सहकारी संस्था चांगल्या सुरू आहेत. येथील राजकारण समाजकारण राज्याला दिशादर्शक आहे. काम करणाऱ्याला संधी मिळत असून कधीही भेदभाव केला जात नाही कार्यकर्त्यांना कायम सन्मान आहे.

तर ॲड.रामदास शेजुळ म्हणाले की, स्वगृही परतल्याचा मला आनंद आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता. परंतु मित्र प्रेमामुळे मी विकासाच्या राजकारणापासून बाजूला गेलो. भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले. परंतु त्या ठिकाणी स्वार्थ आहे.

आमदार बाळासाहेब थोरात व थोरात घराणे हे निस्वार्थी काम करत आहे. त्यांच्या चांगल्या कामाचा राज्यभर लौकिक आहे. आणि आपण कुठेतरी विरोध करतो आहोत याची खंत मनामध्ये होती. विरोधात असणारे अनेक जण स्वच्छ व सुसंस्कृत नेतृत्व असणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचा व्यक्तिगत खूप आदर करतात असे सांगताना यापुढील काळात काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करू असे ते म्हणाले.

यावेळी गबाजी खेमनर, लक्ष्मण वर्पे, कारभारी साबळे, दत्तात्रय थोरात, अण्णासाहेब थोरात, संदीप नागरे, पुजाहारी दिघे, भाऊसाहेब साबळे, दगडू शिंदे, दादा पा.शेपाळ, दगडू शेपाळ,अनिल साबळे, दत्तू वर्पे, अमोल साबळे, कैलास गोराणे, अमोल वर्पे, मुरलीधर थोरात, नारायण थोरात, डॉ. तुषार दिघे, आदिसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

