नगर शहरात मोक्याच्या जागा बळजबरीने ताब्यात घेऊन खंडणी उकळणाऱ्यांचा सुळसुळाट !
पोलिसांचे दुर्लक्ष ; सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
प्रतिनिधी —
अहमदनगर शहरातील उपनगरां मध्ये मारवाडी गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्याच्यावर बेकायदेशीर ताबा मिळवून खंडणी मागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा गुंडांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहरांमध्ये सावेडी व केडगाव उपनगर या भागामध्ये शहराची हद्द वाढ झालेली आहे. या विकासात बिल्डर व जमिन मालकांचे मोठे योगदान आहे. असे असताना सावेडी उपनगरामध्ये मारवाडी व गुजराथी समाजाच्या व्यक्तींच्या मोक्याच्या जागा जमिनी शोधून राजकीय आशीर्वादाने बेकायदेशीर पणे ताबा मारुण खंडणी मागण्याचा प्रकार काही गुंड प्रवृत्तीचे लोक करीत आहेत.

पोलीस प्रशासन या प्रकारकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहेत. अशा खंडणी प्रकरणात पीडित व्यक्तींना पोलीसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही. सदरचा विषय हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने आम्ही मदत करु शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने पीडित व्यक्ती झालेल्या अन्याया विरोधात उघडपणे दाद मागण्याचे धाडस करीत नाहीत. व नाईलाजास्तव जमिन कमी किंमतीत राजकीय मंडळींना विकावी लागते. किंवा संबधीत गुंडाना खंडणी देऊन त्याची कोणतीही वाच्यता न करता तडजोड करावी लागते.

ही ताबे मारणारी टोळी न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल करुन ब्लॅकमेलींग करीत आहे. असेच प्रकार केडगांव उपनगरात व आरणगांव रोड या ठिकाणी सुध्दा राजरोस पणे सुरु आहेत. आरणगांव रोड वर काही समाजाच्या व्यक्ती संघटीत टोळी तयार करुन मोकळया जमिनीवर ताबा मिळवत आहेत. संबधीत भुखंडधारकास सदरचा ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे.

मात्र या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही तक्रारकर्त्यास न्याय मिळत नाही. उलट या बेकायदेशीर ताबे घेणाऱ्या टोळीस पाठीशी घालण्यात येत आहे. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. त्या मुळे जमिनीत गुंतवणुक करण्याचे धाडस करीत नाहीत. हे विकासाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे.

तरी वरील अवैध प्रकारांची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी होवून अशी बेकायदेशीर ताबे मिळवून खंडणीखोरी करणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करुन प्रतिबंध करण्यात यावा. आणि त्यांच्या राजकीय गॉड फादर असणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारी पार्श्वभुमी कडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री, अपर मुख्य गृहसचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
