सावकारांकडून छळ ;  स्वेच्छा मरणाची  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

पोलीस उपनिरीक्षकाची पिडित दांपत्याला धमकी !

सावकारांच्या घरावर छापा…

 

दरम्यान या प्रकरणी तक्रारदार दांपत्यावर या सावकारांकडून घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात होता. पतंगे यांनी या दांपत्याला घारगाव पोलीस ठाण्यात बोलावून धमकी देखील दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे. नेहमीच वादग्रस्त असलेले घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

प्रतिनिधी —

मुद्दल रक्कम आणि व्याजापेक्षा जास्त रक्कम घेऊनही वारंवार पैशाची मागणी करून आणि घारगाव पोलिसांचा धाक दाखवून सतत त्रास देणाऱ्या सावकाराच्या छळाला कंटाळून स्वेच्छा मरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागणाऱ्या दांपत्याच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात येऊन साकूर येथील दोन सावकारांवर  आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील संगिता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्यांनी सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या कडे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी अनधिकृत सावकारी करणाऱ्या सावकारावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

शुक्रवारी दुपारी त्या सावकारांच्या घरावर संगमनेर उपनिबंधक कार्यालयाने छापा मारत चेक, खरेदी खत आणि महत्वाचे कागदपत्र जप्त केले असल्याची माहिती उपनिबंधक संतोष कोरे  यांनी दिली आहे.

साकुर येथील सावकार राहूल किसन डोंगरे आणि सचिन बन्सी डोंगरे यांच्याकडून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले. त्यांनी ठरलेल्या रकमेच्या व्याजापेक्षा चारपट पैसे वसूल केले. तरीही आणखी पैशाची मागणी करत आहेत. आमचे घर बळकाविण्यासाठी वेठीस धरत आहेत. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत गावात बदनामी करत आहेत. पोलिसात खोटे गुन्हे दाखल करणार असल्याचा दबाव टाकत होते. त्या मुळे या दोघा सावकारांकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळत प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून या कुटुंबाने स्वेच्छा मरणाची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे मागितली होती.

अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना कारवाईचे आदेश दिले.  संगमनेरचे उपनिबंधक संतोष कोरे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे, अल्ताफ शेख, ज्ञानेश्वर गोरे, सहायक सहकार अधिकारी प्रदीप वीरनारायण, बी. एन. चतुरे या पथकाने डोंगरे यांचे घर आणि दुकानावर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. कारवाईत महत्वाचे दस्त जप्त करण्यात आले आहेत. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणी तक्रारदार दांपत्यावर या सावकारांकडून घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात होता. पतंगे यांनी या दांपत्याला घारगाव पोलीस ठाण्यात बोलावून धमकी देखील दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे. नेहमीच वादग्रस्त असलेले घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!