संगमनेरात कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा !

दोन पोलीस कर्मचाऱ्यांविषयी चर्चा..

प्रतिनिधी —

संगमनेर शहर आणि तालुक्यात सुरू असलेली गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री काही केल्या बंद होत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्री नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेर शहरातील भारतनगर येथे छापा टाकून पुन्हा गोमांस जप्त केले असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील भारतनगर परिसरात एका निळ्या रंगाच्या पत्र्याच्या गेट असलेल्या घरात एक व्यक्ती गोवंश कत्तल करीत असल्याची माहिती आणि गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या पथकाने वरील ठिकाणी छापा टाकला असता अनिस गुलाम हैदर कुरेशी (वय २४, रा. वार्ड नंबर २, भारतनगर, संगमनेर) हा त्या ठिकाणी गोवंश कत्तल करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातील ८५० किलो असा १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सचिन आडबल, संतोष खैरे, अमृत आढाव व आकाश काळे यांच्या पथकाने पेट्रोलिंग करताना खबर मिळाल्यावर ही कारवाई केली आहे.

स्थानिक पोलीस सहभागी असल्याचा संशय !

संगमनेर शहरात आणि तालुक्यात होणाऱ्या गोवंश कत्तलींमध्ये आणि गोमांस वाहतुकीमध्ये स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. अनेक वेळा छापे घालूनही संगमनेरातील गोहत्या थांबत नाही. याचा अर्थ घरातले भेदीच त्यांना सहकार्य करीत असावेत असा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शहर पोलिसांच्या हद्दीतील कुरण गावातून कत्तल करून ती ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बिन दिक्कतपणे सिन्नर मार्गावर काढून देण्याची मांडवली तालुका पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी केल्याची जोरदार चर्चा असून याबबत वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वेळा त्या कर्मचाऱ्यांची तक्रार देखील करण्यात आली असल्याचे समजते.

शहर पोलिस, नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथक, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथक, पोलीस उपअधीक्षक संगमनेर यांच्या पथकाने देखील अनेक वेळा संगमनेरच्या अवैध गोवंश हत्या कत्तलखान्यांवर कारवाई केलेली आहे. तरीदेखील या ठिकाणी सातत्याने कत्तल होत असल्याच आढळून आले आहे. त्यामुळे काही पोलिसांवर घेतला जाणारा संशय हा खरा ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!