राम हा खरा गांधीजींचा आहे ; गांधी नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार — मधुकर भावे
स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य सदैव प्रेरणादायी
प्रतिनिधी —
काही विघातक शक्तींनी महात्मा गांधीजींना मारले. मात्र त्यांचे विचार कधी मारता येणार नाहीत. जगभरातील सहाशे विद्यापीठामधून गांधी विचार शिकवला जातो. गांधी नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे. तो कोणीही पुसू शकणार नाही. चंद्रयानाने पहिले पाऊल चंद्रावर ठेवले तेव्हा इस्रो नेहरूंना धन्यवाद दिले. राम हा खरा गांधीजींचा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी निमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, राजवर्धन थोरात, बाबा ओहोळ, रणजीत सिंह देशमुख, लहानभाऊ गुंजाळ, रामहरी कातोरे, शरयू देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह शाल पुष्पहार देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे काढले असून गांधींचा विचार हाच शाश्वत विचार असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यावेळी बोलताना मधुकर भावे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार व पक्षनिष्ठा जपून काम केले आहे. १९८५ पासून विधान मंडळात असताना एकही डाग या नेतृत्वावर पडला नाही. विचारावर उभा राहणारा माणूस कधीही अयशस्वी होत नाही. सर्वधर्म समभाव व पुरोगामी विचार जपणारे बाळासाहेब थोरात यांनी वडील भाऊसाहेब थोरात यांचे पांग फेडले असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले.

तर आमदार थोरात म्हणाले की, तालुक्याच्या विकासात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी तालुक्याच्या विकासाला वेळोवेळी साथ दिली. भाऊसाहेब थोरात आणि सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण केली तर डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी केंद्रात पंधरा वर्षे कृषी मंत्री पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. इतका विश्वास नेहरूजींचा त्यांच्यावर होता. देशात हरितक्रांती निर्माण करण्यात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा राहिला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कायम ऋण व्यक्त आपण केले आहे. तालुक्याच्या विकासात मागील पिढीने मोठे योगदान दिले. त्यांचा येथे सन्मान होत आहे. आज अनेक जण काळाच्या ओघात नाहीत. मात्र या सर्वांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

राज्यघटना आणि गांधीजींचा विचार हाच शाश्वत राहणार असून आपल्या सर्वांना तो जपायचा आहे. अडचणी खूप आहेत. मात्र अडचणीत आपण लढतो याची इतिहास नोंद घेईल असेही ते म्हणाले.

यावेळी तालुक्यातील विविध ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आमदार थोरात यांनी केला यावेळी अनेकांना गहिवरून आले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी आमदार. डॉ. सुधीर तांबे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबा ओहोळ यांनी आभार मानले.
