औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्त्वाची – हर्षवर्धन मालपाणी
७५ वा प्रजासत्ताक दिन मालपाणी उद्योग समूहात उत्साहात साजरा !
प्रतिनिधी —
औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिथे सुरक्षितता तिथे प्रगती हे औद्योगिक प्रगतीचे सूत्र आहे. असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक हर्षवर्धन मालपाणी यांनी येथे केले.

भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मालपाणी उद्योग समूहात उत्साहात साजरा करण्यात आला. मालपाणी इस्टेट येथे हर्षवर्धन मालपाणी व इशिता मालपाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभाग व्यवस्थापक शिवाजी आहेर, कामगार नेते माधव नेहे, प्रदीप कानवडे, रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, विशाल वाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या देशाची प्रगती खूप झपाट्याने होत असून आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पुढे आपल्या अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. येत्या काळात भारताचा संपूर्ण जगावर प्रचंड मोठा प्रभाव पडणार असून एक सामर्थ्यवान महाशक्ती आणि महागुरू होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल आत्मविश्वासाने सुरु आहे. असे मालपाणी म्हणाले.

यावेळी मालपाणी यांचा सत्कार जमादार तिलाराम रावत यांच्या हस्ते तर इशिता मालपाणी यांचा सत्कार जमादार भीमसिंग गोरखा यांच्या हस्ते करण्यात आला. सुरक्षा विभागाचे प्रमुख भारत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋषिकेश आप्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभागातील जवानांनी घोष पथकासह राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन अप्रतिम व दिमाखदार पथसंचलन सादर करताच त्यास उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून प्रतिसाद दिला. या प्रसंगी ध्वजपूजन व ध्वजारोहण मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले सामुहिक राष्ट्रगीत झाले. सर्वांना पेढे वाटण्यात आले. मागील वर्षभरात सापडलेल्या अनेक मौल्यवान गोष्टी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल सुरक्षा विभागातील सुनील पानसरे, प्रकाश थोरात, सागर कानडे, राजू शेटे, पांडुरंग वामन या जवानांना तर शिस्तबद्ध पथ संचलनाचे नेतृत्व केल्याबद्दल ऋषिकेश आप्रे यांना भेटवस्तू देऊन मालपाणी दांपत्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कामगार नेते माधव नेहे यांनीही भाषणाद्वारे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मुरारी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन तीलाराम रावत यांनी केले. मालपाणी उद्योग समूहातील राहूल शेरमाळे, मंगेश उनवणे, राम पाटसकर प्रकाश शेराल, संतोष कनोजे,संतोष राऊत , राम वामन, विनायक भोईर, किशोर वडनेरे, हेमंत घोडेकर, भगवान पलोड, यांच्यासह अनेक विभागांचे प्रमुख व स्टाफ सहकारी कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
