महिलांच्या उदंड प्रतिसादात रंगला “खेळ मांडीयेला”
महिलांच्या सहभागाने उखाणे, हसत, खेळत सामूहिक नृत्यांमुळे संस्मरणीय कार्यक्रम…
फुगड्यांची धमाल व उखाण्यांनी सगळ्यांना खळखळून हसवले
प्रतिनिधी —
डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मधील महिलांकरता एकविरा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या आदेश बांदेकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या कार्यक्रमांमध्ये संगमनेर मधील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामुहिक नृत्य, फुगड्या, उखाणे विविध खेळ यामध्ये अगदी सहज व मनमोकळेपणाने सहभाग घेतल्याने अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात झालेला हा कार्यक्रम सर्व महिला भगिनींसाठी संस्मरणीय ठरला.

जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, शरयूताई देशमुख, डॉ.मैथीली तांबे, शोभाताई कडू, उत्कर्षा रुपवते आदींसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांची इंट्री होताच महिला भगिनींकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाडात त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर बहिणाबाईंच्या माझी माय सरस्वती या गीताने सुरुवात करत आदेश बांदेकर यांनी अनेक महिलांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी घेतलेले उखाणे लक्षवेधी ठरले. या उखाण्यांमुळे संपूर्ण सभागृह खळखळून हसले. प्रत्येक महिलेला बोलते केल्यानंतर त्यांनी महिलांच्या स्पर्धा घेतल्या यामध्ये संगीत खुर्ची, दिशा ओळख, रिंग फेक, डोक्यावर बादली घेऊन चालले अशा विविध स्पर्धा घेतल्या यामध्ये सुमारे ३५१ महिलांनी सहभाग घेतला.

मधून मधून होणारी शेरोशायरी करत महिलांशी संवाद साधताना कुटुंबाशी असणारे नाते एकीचा संदेश त्यांनी दिला. याचबरोबर खेळांच्या मधून उपस्थित महिलांना सामूहिक नृत्यांमध्ये सहभागी होत सैराट मधील झिंगाट, चंद्रमुखी, आई एकविरा, अशा विविध मराठी गीतांवरती डान्स केला.

याचबरोबर सामूहिक फुगडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संगीतावर सुरू झालेल्या या फुगड्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संपूर्ण मैदान फुगड्यांनी फुलून गेले.
आदेश बांदेकर म्हणाले की, समाजाच्या आणि देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असून सतत काम करणाऱ्या या माऊलींच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. या तालुक्यातील प्रत्येक नागरिक व महिलांची ते परिवारातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत आहेत. महाराष्ट्रातील एक जाणकार व सुसंस्कृत नेतृत्व हे संगमनेरने राज्याला दिले असून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोरोना संकट असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या संकटकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सर्वांना बरोबर घेत निष्ठेने प्रामाणिकपणे व स्वच्छ हेतूने काम करून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. हाच वारसा थोरात परिवार कायम जपत आला असून संगमनेरकरांनी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयश्री थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी आभार मानले.
मकर संक्रांतिनिमित्त एकविरा फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व महिला भगिनींना तिळगुळ व वाण देण्यात आला असून खेळ मांडीयेला या खेळात सहभागी झालेल्या ३५१ महिलांना गिफ्ट देण्यात आले. तर यामध्ये प्रथम आलेल्या जयाताई राहुल चितळे, द्वितीय क्रमांक धनश्री सुनील खेमनर व तृतीय रीना विशाल खरात यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
