विद्रोही काव्य देशाचा सन्मान व वेदना व्यक्त करणारे असते – नितीन चंदनशिवे
प्रतिनिधी —
विद्रोही काव्य हे व्यक्ती, समाज आणि देशाचा सन्मान व वेदना व्यक्त करणारे असते. तसेच ते माणसाच्या वास्तववादी जगण्याशीही संबंधित असते. राम हे मर्यादापुरुष होते, ते सर्वांनाच सन्माननीय व आदर्श आहेत. मात्र आता त्यांचा राजकीय फायद्यासाठी उपयोग होऊ लागला. म्हणजेच जगण्यासाठी कामाची बात नाही तर रामाची बात होऊ लागली, यावर चिंतन होणे गरजेचे आहे, असे परखड मत विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी मांडले.

ते म्हणाले, विद्रोहाचा बाऊ करण्यापेक्षा त्याचा व्यापक अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे. आमचा विद्रोह म्हणजे समतेचा स्विकार आणि विषमतेला तिव्र नकार आहे. विद्रोही कार्यकर्त्यांची प्रथम व अंतिम बांधिलकी फक्त आणि फक्त समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाशी असावी.

विद्रोही काव्य संमेलन आयोजित करण्यासाठी खरोखरच दम लागतो, तो संगमनेरकरांनी दाखविला, त्याबद्दल आयोजकांचे चंदनशिवे यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी काही विद्रोही कविताही सादर केल्या.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या संगमनेर शाखेच्या वतीने नुकत्याच शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा- २०२४ उत्साहात पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन नितीन चंदनशिवे यांचे हस्ते परिवर्तनाचे अशोक चक्र फिरवून झाले. प्रसंगी भारतीय संविधानाची उद्देशिका गाण्यात आली. संविधान उद्देशिकेस सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अरुण घोडेराव होते. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महासचिव डॉ. जालिंदर घिगे, रानकवी तुकाराम धांडे, स्वागताध्यक्ष प्रविण गवांदे, सुरेश वाकचौरे, डॉ. राहूल हांडे, कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर, अध्यक्ष चंद्रकांत पवार, सचिव श्रीकांत माघाडे, भास्कर बुलाखे, राजेश माघाडे, मनिषा पटेकर, ईशान संगमनेरकर मंचावर उपस्थित होते.

या निमित्ताने डॉ. राहूल हांडे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संगमनेरकरांच्या वतीने भव्य हृद्य सत्कार करण्यात आला. उद्घाटक व प्रमुख अतिथी नितिन चंदनशिवे यांचे हस्ते त्यांना पगडी घालून व सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन संजयकुमार शिंदे यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. जालिंदर घिगे यांनी केले तर प्रविण गवांदे यांनी राज्याच्या विविध ठिकाणाहून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेले कवी व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण घोडेराव यांनी विद्रोही साहित्य, काव्य यांची चळवळ व्हावी, त्याद्वारे सामाजिक वास्तव जगासमोर यावे, असे मत व्यक्त केले . घोडेराव यांनीही काही विद्रोही कविता सादर केल्या.

या विद्रोही काव्य स्पर्धेसाठी एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते . काव्य स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला .
प्रथम क्रमांक कुमार कार्तिक इंगळे, अमरावती यांच्या- “मार्ग संपले नाही माझ्या ध्येयाचे” या कवितेने पटकावला. त्यास माघाडे परिवारातर्फे सर्जेराव माघाडे यांचे स्मरणार्थ , स्मृती चिन्ह व रु. ५००० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांक ऋषिकेश सोळसे, तळेगाव, संगमनेर यांच्या ” जातीयतेचे येथे लेवून अत्तर” या कवितेस प्राप्त झाला. त्यांस समता परिषद , अहमदनगर यांचे वतीने स्मृती चिन्ह व रु. ३५०० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले .
तृतीय क्रमांक रंगराज ढेंगळे, नाशिक यांच्या ” घोडे ” या कवितेस प्राप्त झाला. त्यांस विश्वनाथ घोसाळे यांचे स्मरणार्थ स्मृती चिन्ह व रु. ३००० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.
चतुर्थ क्रमांक खळींद्रकुमार लोखंडे, सातारा यांच्या ” खरा महाराष्ट्र ” या कवितेस प्राप्त झाला. त्यास भिमाबाई सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ स्मृती चिन्ह व रु. २५०० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.

उत्तेजनार्थ एकूण दहा कविंना प्रत्येकी रु. एक हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यात अश्विनी खंडागळे- पाथर्डी, अहमदनगर यांच्या ” बस्स झालं आता.. ” , कोमल म्हस्के संगमनेर , यांच्या ” तुझी कविता – माझी कविता ” , तानाजी सावळे- अकोले, अहमदनगर, यांची ” थैमान ” या कवितेला, ह. भ. प. निवृत्ती महाराज कानवडे, निमगाव पागा , अहमदनगर यांच्या ” देवा तु आहेस का… ??” , बबलू मिना शिरसाठ, अहमदनगर यांच्या ” व्यवस्थेच्या विरुद्ध “, लक्ष्मी यादव, मुंबई यांच्या “आजकाल बायाही भंपक झाल्याय ” श्रावणी कर्डिले, सलाबतपूर- नेवासा अहमदनगर यांच्या ” माझं ध्येय “, संजय अहिरे, नाशिक यांच्या ” शेतकरी आंबेडकर “, संतोष रामचंद्र जाधव, ठाणे यांच्या “हे व्यवस्थे “, भगवान अहिरे यांच्या ” धाव विठ्ठला ” या कवितेस उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली. परीक्षक म्हणून प्रा.बाबासाहेब शेलार, प्रा. सुशांत सातपुते व डॉ. संदिप तपासे यांनी काम पाहिले.

आभार चंद्रकांत पवार यांनी मानले. सूत्र संचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे श्रीकांत माघाडे, संजयकुमार शिंदे, कारभारी देव्हारे, असिफ शेख, राजेश माघाडे, विजय पवार, विश्वनाथ आल्हाट, सुशांत सातपुते, डि. के. जाधव, अनिल मुन्तोडे, अनुराधा आहेर, विनय घोसाळे, अनंत केदारे, बापु चंदनशिवे, गौतम मिसाळ, शरद तुपविहिरे, रमेश शिंदे, दिलिप बर्डे, अझीज ओहरा, संदीप मोकळ, जावेद शेख, संजय भालेराव, एल. एस. आव्हाड, विशाल पगारे, अनिकेत घुले, यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमात राजगुरुनगरहून प्रा.उमेश जगताप व नगरहून प्रा. सुनील सातपुते यांनी विशेष उपस्थिती होती.
सेवादल व छात्रभारती, संगमनेर, विद्रोही विद्यार्थी संघटना,अहमदनगर यांचे विशेष सहकार्य लाभले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अनंत केदारे यांनी केले तर प्रमाणपत्र लेखन प्राचार्य राजेश माघाडे यांनी केले.
