काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची संगमनेर भाजपची मागणी
प्रतिनिधी —
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन आज भाजपच्यावतीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ व मारहाण करू असे निषेधार्ह वक्तव्य केले आहे.
देशाच्या पंतप्रधान पदावर असलेल्या कोणाही व्यक्तीबाबत ही भाषा वापरणे केवळ निषेधार्हच नाही तर बेकायदेशीर आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धच्या वक्तव्या वरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांच्यावर केस दाखल झाली. त्यापेक्षा गंभीर स्वरुपात थेट पंतप्रधान मोदी यांना शिव्या देऊ व मारु असे गंभीर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर त्या कारणास्तव आस्थापनेनुसार तातडीने कार्यवाही करावी.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनीही देवेंद्र फडणविस यांना काशीचा घाट दाखविण्याचे वक्तव्य केले आहे. काशीचा घाट मृत्यू नंतर दाखवितात. त्यामुळे ही सुद्धा जीवे मारण्याचीच धमकी आहे. अशी धमकी दिल्याबद्दल नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करावी. अशी देखील मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष अशोक इथापे, किसान मोर्चा अध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, हरीश वलवे, माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, हरीश चकोर, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष रेश्मा खांडरे, ज्योती भोर, दिलीप रावल, शिवकुमार भंगीरे, विकास गुळवे, जग्गु शिंदे, अरुण शिंदे, अमोल रणाते, सुमित राऊत, प्रमोद भोर, सोमनाथ बोरसे, संजय वाकचौरे, सचिन मुके यांनी पोलीस प्रशासनाकडे सदर निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
