ग्रामपंचायतींच्या निकालातून सरकार विरोधातील जनतेची तीव्र नाराजी समोर आली — आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनधी —
संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आमदार थोरात गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. केंद्र व राज्यातील सरकार विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर येईल असे प्रतिपादन काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे ग्रामपंचायत निवडणुकींमधील विजयी उमेदवारांचा सत्कार आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ढोलेवाडी व बोरबन या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून ढोलेवाडीच्या सरपंच पदी शालिनी बाळासाहेब ढोले, तर बोरवन च्या सरपंच पदी अरुणा बाळासाहेब गाडेकर यांची निवड झाली आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी अमोल उर्फ नरेंद्र संभाजी गुंजाळ यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली असून १७ पैकी १७ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

तर आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये आमदार थोरात गटाने दहा जागांवर बाजी मारत मंत्री विखे गटाचे पानिपत केले असल्याचा दावा थोरात समर्थकांनी केला आहे. सरपंच पदी थोरात गटाचे पाणी वाटपासाठी असलेले ग्रामपंचायत कर्मचारी उर्फ पाणीवाले बाबा नामदेव किसन शिंदे हे विजयी झाले आहेत.

पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायत मध्ये सर्व नऊ सदस्य काँग्रेस पक्षाचे विजयी झाले असून सरपंच पदी सोनाली संदीप कर्पे या विजयी झाल्या आहेत. तर घारगाव व आश्वी या ग्रामपंचायत मध्येही काँग्रेस पक्षाचे काही सदस्य विजयी झाले आहेत.

आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात कायम सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जात आहे. सर्व ग्रामपंचायत मध्ये झालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या एकीचा व विकास कामांचा आहे. या निवडणुकीत बाह्य शक्तींनी मोठ्या दबावाचा व इतर गोष्टींचा खूप वापर केला. मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही.

संगमनेर तालुक्यातील जनतेला त्यांची दहशत मान्य नाही. आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मध्येही कार्यकर्त्यांनी जिकरीने लढा दिला. तेथे मोठ्या दबाव तंत्राचा वापर झाला. खूप ताकद लावली गेली. मात्र जनतेने दडपशाही झुगारली. राहता तालुक्यामध्ये ही काँग्रेस पक्षाच्या विचाराला मोठे यश मिळाले आहे. यापुढेही सर्वांनी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे असे सांगताना राज्यातील व केंद्रातील सरकारवर जनतेची पूर्ण नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अमली पदार्थांची तस्करी हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारचे शेतकरी व सर्वसामान्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेमध्ये मोठा रोष असून राज्यात सर्वत्र काँग्रेसची हवा आहे. आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

