मराठा आरक्षणाचा प्रश्न विखे पाटील सोडवू शकतात ; गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास !
राजेश चौधरी यांची टीका, भाजपला घरचा आहेर
प्रतिनिधी —
मराठा आरक्षणाचा प्रश्न विखे पाटील सोडवू शकतात. चुकीच्या लोकांकडे भाजपचे नेतृत्व असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास..अशी सडेतोड टीका संगमनेर तालुक्यातील मागील निवडणुकीचे भाजपा विधानसभेचे उमेदवार राजेश चौधरी यांनी सोशल मीडियाच्या द्वारे केली आहे.

मराठा आरक्षणाचे लोन सर्वत्र पसरले आहे. आंदोलक आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी मोर्चे, निषेध, उपोषण आणि त्याचबरोबर गंभीर अशा आत्महत्येचे सत्र देखील सुरू झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून उमटत आहेत.

त्यातच आता संगमनेर तालुका भाजपमध्ये देखील उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सन २०१४ ची संगमनेर विधानसभेची निवडणूक लढविलेले भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते राजेश चौधरी यांनी सोशल मीडिया मधून फडणवीसांवर थेट सडेतोड टीका करून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्या व्यक्तिगत रागाला वाट मोकळी करून दिली आहे.

चौधरी यांच्या या फेसबुक वरील पोस्टवर प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या असून चौधरींनी त्यास ही उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी भाजपाचे वाटोळे केले आहे. आमची निष्ठा भाजपाशीच आहे. पण फडणवीस यांनी भाजपा संपवली आहे. सन २०२४ च्या निवडणुकीनंतर हे दिसून येईल.

तर त्यांच्या पोस्टला सहमती दर्शविताना दीपक उगले यांनी म्हटले आहे की, फडणवीस यांनी भाजपची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपचे सर्व निष्ठावान संपवले आहेत. एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे असो व इतर तसेच इतर पक्षातील विविध नेते घेऊन पक्ष वाढवण्याचा जो प्रयत्न ते करत आहेत. आपली माणसे ही आपली असतात असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणजे भाजपा नाही. भाजपा ही काही एकट्या फडणवीसांची पार्टी नाही. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. फडणवीस कधीही घरी जाऊ शकतात असेही चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरी यांच्या या पोस्टने संगमनेर भाजपा आणि फडणवीस समर्थकांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मात्र या पोस्टमुळे संगमनेर भाजपा अंतर्गत काहीतरी बिघडले असल्याचे दिसून आले आहे.

