फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या आभासी जगात वाहवत जाऊ नका – डॉ. एकता वाबळे

 प्रतिनिधी —

फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि व्हाट्सअप सारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात वाहवत जाऊ नका. यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला आणि बुद्धिमत्तेला पर्याय नाही म्हणूनच आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा असा सल्ला प्रेरणादायी वक्त्या व समुपदेशक डॉ. एकता वाबळे यांनी दिला.

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकूसा हायस्कूल येथे ‘नव्या युगाच्या नव्या दिशा’ या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे उपस्थित होते.

डॉ. वाबळे पुढे म्हणाल्या की, आपल्या मनाला दररोज सकारात्मक सूचना द्या आणि जीवनात चांगले बदल घडवून आणणाऱ्या माणसांविषयी आणि परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभासी सामाजिक माध्यमांच्याद्वारे चांगलेही घेता येते तेवढेच घ्या. स्क्रीन टाईम कमी करा. आपण जे पेरतो तेच उगवते हे लक्षात ठेवा. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी जीवनातच बचत व गुंतवणुकीचे धडे घ्या. श्रीमंत होण्याचे नक्कीच ध्येय ठेवा पण श्रीमंत होताना माणसातले माणूसपण हरवून देऊ नका.

आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे या मातीत आपण जन्माला आलो याचा अभिमान बाळगा. राष्ट्रभक्ती आपल्या नसानसात भिजू द्या . आई-वडील आणि गुरु हे आपले जीवनातील आदर्श असावेत, केवळ पैसाच महत्त्वाचा नाही मित्र व नातेसंबंध जपा तीच खरी संपत्ती आहे. जीवनात वाचन संस्कृतीला महत्त्व आहे. आता किंडल सारखी वाचन ॲप सुद्धा उपलब्ध आहेत त्याचाही वापर करा. जीवनात जे जे लोक यशस्वी झाले त्यांनी वाचन संस्कृतीचा फायदा घेतला आहे हे लक्षात घ्या. नकारात्मक विचार केला तर त्याचा शरीरावरील नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घ्या . स्वच्छता व संतुलित आहाराला महत्त्व द्या. राग द्वेष विसरून माफ करायला शिका प्रेमाने जग जिंकता येते असा सल्ला त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात सोमनाथ जगदाळे म्हणाले की, शालेय जीवनात जे चांगले संस्कार होतात तेच खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया होय.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सुनील कडलग यांनी करून दिला. सूत्रसंचालन स्मिता जाधव यांनी तर आभार गायत्री सोनवणे यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!