भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे स्मरण करावे — प्रा. डॉ. बी.व्ही.चव्हाण 

संगमनेर महाविद्यालयात भारतरत्न कलाम यांची जयंती साजरी

प्रतिनिधी —

भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. तसेच त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झोकून देऊन केलेल्या कार्याचे स्मरण करावे. असे मत डॉ.बी व्ही चव्हाण यांनी व्यक्त केले.

संगमनेर महाविद्यालयात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनाचे औचित्यसाधून, विद्यार्थी वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य प्रो.डॉ. अरुण गायकवाड, ग्रंथालय समितीचे कार्याध्यक्ष प्रा.अरुण लेले, डॉ. हरप्रीत पंजाबी, प्रा. राजू त्रिभुवन, प्रा.डॉ. शरद थोरात, प्रभारी ग्रंथपाल प्रा.विशाल जाधव, रोहिदास बर्डे, सचिन नवले, संतोष उघडे, गिताराम गुळवे आदी शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

डॉ. चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले लक्ष नियमित अभ्यासाबरोबर ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनावर केंद्रित करावे. कारण डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे  साहित्य विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनात डॉ.कलामांनी अठरा पुस्तकांचे लेखन केले. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.अग्निपंख सारख्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना हमखास प्रेरणा मिळते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या पुस्तकांच्या सहवासातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. त्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या चांगल्या साहित्याचे वाचन करावे.

 

वाचन प्रेरणा दिन आपण ज्यांच्या नावे साजरा करतोय ते  भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे. त्यांची जयंती साजरी करताना मनात निश्चितच आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा. कारण त्याला वयाचेही बंधन नसते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे लेखन  तरुणाईसाठी नेहमीच नवी दिशा देणारे आहे. त्यांना मिसाईल मॅन ही उपाधी लावण्यात येते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी ज्ञानार्थी व्हावे परीक्षातील नव्हे. असेही यावेळी बोलताना डॉ.बी.व्ही चव्हाण म्हणाले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, महाविद्यालयात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंतीच्या निमित्ताने वाचन संस्कृती जोपासण्याची खरी गरज आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांसाठी खूप काही घेणारे आहे.कारण त्यांचे व्यक्तिमत्व हे ग्रामीण भागातून आलेले होते. अगदी छोट्याशा गावात पेपर टाकण्याचे काम त्यांनी केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तसेच मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. संघर्ष करावा. कारण कलामांनी जीवनात सतत संघर्ष केलेला आहे. कष्टातूनच त्यांनी राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली.परंतु कधीही त्यांच्या मनाला गर्वाचा स्पर्शसुद्धा झाला नाही.

त्यांच्या स्वभावात असणारा हाडाचा शिक्षक आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत कायम जागृत होता. ही गोष्ट खूपच लक्षणीय आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते लढत राहिले. आपल्याला मिळणारे मानधन त्यांनी गोरगरिबासाठी देऊन टाकले. त्यांच्याकडे कमालीची सहानभूती होती. त्यांच्या वाढदिवशी आपण वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो.ही महाविद्यालयीन तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येणाऱ्या नवीन पुस्तकाचे वाचन करून ज्ञानसंपदा वाढविणे आवश्यक आहे. महाविद्यालयात मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने विद्यार्थ्यांनी करावे.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अशा थोर असणाऱ्या व्यक्तीच्या जन्मदिनी आपण संकल्प केला पाहिजे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून जास्तीत जास्त अवांतर वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रमाणपत्र व बक्षीस वाचन प्रेरणा दिन या दिवशी देण्यात येईल अशी घोषणा ही प्राचार्य यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.अरुण लेले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शिस्त अंगी बाळगावी, त्याचबरोबर नियमित ड्रेसकोड व ओळखपत्र परिधान करून महाविद्यालयात प्रवेश करावा.ग्रंथालयांमध्ये नियमित बसून, वाचन करावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करावे.

सूत्रसंचालन व आभार प्रा. विशाल जाधव यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम संगमनेर महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संखेने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!