संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल कशामुळे पडला याचे कारण आजही गुलदस्त्यात !

पूल कसा पडला याचे सत्य कारण जाहीर करावे — ॲड. श्रीराम गणपुले

प्रतिनिधी —

गेल्या दोन दिवसापासून संगमनेर शहरात म्हाळुंगी नदीच्या पुलावरून बरेच वातावरण तापले आहे. संगमनेर शहर आणि प्रवरा नदीला जोडणारा हा पूल मागील पावसाळ्याच्या वेळी खचला, तूटला, ब्रेक झाला होता. तेव्हापासून या पुलाच्या बाबत शहराचे आणि राजकारण्यां मधले वातावरण ढवळून निघाले होते. पूल पडला खरा, पण तो कशामुळे पडला ? कोणामुळे पडला ? नैसर्गिकरित्या पडला की मानवी चुकांनी पडला ? हा ‘पूल पडला कसा’ हे मात्र आजही ‘गुलदस्त्यात’ आहे. त्यामुळे हा पूल पडला कसा ? याचे सत्य कारण नगरपालिकेने, सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा जाहीर करावे असे आवाहन माजी नगरसेवक भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी केले आहे.

गणपुले यांनी केलेल्या आवाहना बाबत नगरपालिकेचे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे आहे. कारण हा पूल नैसर्गिक रित्या पडला नसून मानवनिर्मित विविध कारणांनी व चुकांमुळे पडलेला आहे. असा आरोप गणपुले यांनी केला आहे. आणि जर हे सत्य नसेल तर पूल कसा पडला याचे ‘तांत्रिक इन्स्पेक्शन करावे म्हणजे, दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

एक मात्र खरे आहे की पूल पडला कसा आणि कशामुळे ? हे जाणून घेण्यास संगमनेरचे नागरिक देखील उत्सुक आहेत. कारण हा पूल पडला त्यावेळेस विविध चर्चा होत्या. नगरपालिकेच्या भूमीगत गटारीचे बांधकाम, त्यासाठी पुलाजवळ करण्यात आलेले खड्डे, गटारीचे पाणी जाण्यासाठी एका माजी नगरसेवकाने हस्तक्षेप करून पुलाच्या पायाजवळ खोदलेले खड्डे, वाळू उपसा या सर्वच प्रकारामुळे पुलाचा पाया आणि भराव बाधीत झाला आणि त्यामुळे हा पूल पडला असेही त्यावेळी बोलले जात होते. सुरुवातीला पूल खचला आहे असे जरी वाटत असले तरी नंतर तो पूर्णपणे काहीही उपयोगाचा राहिलेला नसून सगळा पूल तुटला गेला आहे. निकामी झाला आहे. हे उघड झाले.

नगरपालिका प्रशासनाला आणि संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पूल कशामुळे तुटला याचे खरे कारण माहित आहे. मात्र ते लपवले जात असून पालिका प्रशासनाच्या आणि त्या माजी नगरसेवकाच्या चुका पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. यातील सत्य बाहेर आले तर अनेकांना अडचण निर्माण होणार असून राजकीय कारकिर्दीसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील वेगवेगळ्या कार्यवाहीला, चौकश्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे पूल कशामुळे पडला याचे खरे कारण पुढे येत नाही. किंवा ते शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि ते शोधले असले तरी त्या संदर्भातला अहवाल जाहीर केला जात नाही किंवा तसा कुठलाच प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आलेला दिसत नाही.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!